इस्राईलमध्ये 1 नोव्हेंबरपासून लस चाचणी सुरू

जेरूसलेम – इस्राईलमध्ये पुढच्या आठवड्यापासून कोविड-19 विरोधी लसीची चाचणी सुरू होणार आहे. इस्राईलची सरकारी संशोधन संस्था “इन्स्टिट्युट फॉर बायोलॉजिकल रिसर्च’ या संस्थेने ही घोषणा केली आहे. इस्राईलमध्ये विकसित करण्यात आलेल्या कोविड-19 विरोधी लसीची वैद्यकीय चाचणी 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार असून 80 व्यक्‍तींवर या लसीची प्राथमिक चाचणी सुरू करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्याची चाचणी 960 व्यक्‍तींवर डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे.

या चाचणीची व्याप्ती तिसऱ्या टप्प्यात आणखीन वाढवून 30 हजार जणांवर चाचणी केली जाणार असून आगोदरच्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल तपासून पुढील वर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात हा तिसरा टप्पा सुरू होणार आहे.

आपल्या संशोधकांच्या क्षमतेवर विश्‍वास असून सुरक्षित आणि परिणामकारक लसीचे उत्पादन करू शकतो असा आपल्याला आत्मविश्‍वास वाटत असल्याचे इन्स्टिट्युटचे संचालक डॉ. शम्युएल शापिरा यांनी सांगितले. इस्राईलच्या नागरिकांसाठी दिड कोटी डोसचे उत्पादन करणे हे आपले उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

इस्राईलची लोकसंख्या 90 लाख इतकी असून 3 लाख जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत तिथे 2,400 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. “इन्स्टिट्युट फॉर बायोलॉजिकल रिसर्च’ही संस्था संरक्षण संरक्षण मंत्रालयाकडून चालवले जाते. जगभरात 40 लसींच्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here