कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित समीर गायकवाडचा मृत्यू, सांगलीत खळबळ !…

    13

    सांगली: ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी समीर गायकवाड याचा आज सांगलीत मृत्यू झाला. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समीर गायकवाडची प्रकृती अचानक खालावल्याने त्याला तातडीने सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा साधक होता आणि पानसरे हत्या प्रकरणात अटकेत असलेला पहिला संशयित आरोपी होता.

    जामिनावर होता बाहेर..

    कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापुरात गोळीबार झाला होता, तर २० फेब्रुवारी २०१५ रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या हायप्रोफाईल हत्या प्रकरणात सप्टेंबर २०१५ मध्ये समीर गायकवाडला सांगलीतून अटक करण्यात आली होती. काही वर्षे तुरुंगात काढल्यानंतर तो सध्या न्यायालयीन जामिनावर बाहेर होता.

    पानसरे हत्या प्रकरणाचा खटला अद्याप न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणातील एक महत्त्वाचा दुवा आणि मुख्य संशयित मानल्या जाणाऱ्या गायकवाडच्या मृत्यूमुळे आता या प्रकरणाच्या कायदेशीर प्रक्रियेत काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here