
अहिल्यानगर – नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या नेप्ती उपबाजार समितीला दिलेले भानुदासजी एकनाथ कोतकर हे नाव काढण्याच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी सहा आठवड्यात करण्याचे आदेश औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विभा कंकणवाड़ी व हितेन वणेगावकर खंडपीठाचे दिले आहेत. या प्रकरणी नगरसेवक अमोल येवले यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर 7 जानेवारीला सुनावणी देत खंडपीठाने वरील आदेश पारित केले आहेत. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीला 15 ऑगस्ट 2024 रोजी भानुदास कोतकर यांचे नाव देण्याचा मोठा सोहळा पारपडला होता.
या नामांतराच्या विरोधात 27 ऑगस्ट 2024 रोजी अमोल येवले यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व राज्याचे सहकार आयुक्त यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केले. या अर्जावर जिल्हा उपनिबंधकांनी 13 फेब्रुवारी 2025 रोजी आदेश पारित करून 4 जून 1987 च्या परिपत्रकानुसार बाजार समित्यांना राजकीय किंवा सामाजिक पुढाऱ्यांची नाव देता येत नाही. त्यामुळे सदरचे नाव काढुन टाकण्यात यावे, असे आदेश दिले होते. जिल्हा उपनिबंधकांचा हा आदेश पणन संचालकांनीही कायम ठेवला होता. मात्र याचिकाकर्ते येवले यांनी याबाबत पत्रव्यवहार व पाठपुरावा करून सुध्दा राजकीय दबावापोटी सदरच्या आदेशाची अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे अमोल येवले यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली असून भानुदासजी एकनाथ कोतकर हे नाव काढण्याच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी सहा आठवड्यात करण्याचे आदेश पारित केले आहेत. याचिकाकर्ते येवले यांच्या वतीने अॅड्. सुधीर झांबरे यांनी बाजू मांडून युक्तिवाद केला.




