
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले आहेत. यावेळी असदुद्दीन ओवेसींच्या एम एमआयएमनं महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली आहे. राज्यातील 29 पैकी 13 महापालिकांमध्ये एमआयएमनं खातं उघडलं आहे. एमआयएमनं 13 महापालिकांमध्ये 125 जागा जिंकवून आणल्या आहेत. असदुद्दीन ओवेसी यांनी ही कामगिरी ऐतिहासिक असल्याचं म्हटलं. भाजप किंवा विरोधकांच्या इंडिया आघाडीसोबत जाणार नसल्याचं ओवेसींनी स्पष्ट केलं. ओवेसींनी म्हटलं की आमची लढाई आम्हाला जनादेश देणाऱ्यांसाठी असेल, सत्तेच्या समीकरणाची नसेल.
असदुद्दीन ओवेसींनी हैदराबादमध्ये आज सकाळी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विजयाचं श्रेय कार्यकर्ते आणि मतदारांना दिलं. एमआयएम केवळ एका वर्गाची पार्टी राहिली नाही, असं ओवेसांनी म्हटलं. ते म्हणाले की, मी अल्लाहचे आभार मानतो, आमच्या काही हिंदू भाऊ, ज्यामध्ये दलित, अनुसूचित जाती आणि अनुसुचित जमातीचे उमेदवार आहेत, ते आमच्या पक्षाच्या चिन्हावर जिंकले आहेत.
एमआयएमनं छत्रपती संभाजीनगरमध्ये 33 जागा जिंकल्या आहेत. सोलापूरमध्ये देखील एमआयएम भाजपनंतर दुसरा पक्ष ठरला आहे. मुंबई महापालिकेत एमआयएमच्या 8 जागा निवडून आल्या आहेत.






