
मतमोजणी केंद्रावर पोलिसांवर हल्ला करणाऱ्या माजी महापौरांसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविदयालयाच्या मतमोजणी केंद्रावर ही घटना घडली होती.
छत्रपती संभाजीनगर: शासकीय अभियांत्रिकीमहाविद्यालयात असलेल्या मतमोजणी केंद्रावर प्रवेश करण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर, पोलीस अधिकाऱ्यांसोबत काही जणांनी धक्काबुक्की करून बाचाबाची केली. तसेच पोलिसांवर हल्ला केला. ही घटना 16 जानेवारी रोजी सकाळी घडली होती. या प्रकरणात शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या माजी महापौर विकास जैन यांच्यासह अन्य दोन कार्यकर्त्यांच्या विरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.छत्रपती संभाजीनगर : शासकीय अभियांत्रिकीमहाविद्यालयात असलेल्या मतमोजणी केंद्रावर प्रवेश करण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर, पोलीस अधिकाऱ्यांसोबत काही जणांनी धक्काबुक्की करून बाचाबाची केली. तसेच पोलिसांवर हल्ला केला. ही घटना 16 जानेवारी रोजी सकाळी घडली होती. या प्रकरणात शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या माजी महापौर विकास जैन यांच्यासह अन्य दोन कार्यकर्त्यांच्या विरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात सहायक पोलीस आयुक्त सागर शिलवंत देशमुख (वय ३५) यांनी वेदांतनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, सागर देशमुख हे चार महिन्यापासून शहरात सहायक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत आहेत. १६ जानेवारी रोजी सागर देशमुख हे बंदोबस्तासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविदयालयाच्या परिसरात कर्तव्यावर होती. या ठिकाणी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १८, १९, २०, २१, २२ व २७ यांची मतमोजणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू होती. मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतमोजणी केंद्राकडे येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेटिंग करून प्रवेश नियंत्रित केला जात होता. उमेदवार आणि त्यांच्या मर्यादित प्रतिनिधींनाच निवडणूक अधिकारी (आरओ) यांनी दिलेल्या ओळखपत्रांच्या आधारे प्रवेश देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
गेट ढकलून केंद्रात घुसले, पोलिसांसोबत केली धक्काबुक्की..
एसीपी सागर देशमुख यांनी तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ ते ९.३० वाजेच्या दरम्यान मुख्य प्रवेशद्वारासमोर मोठी गर्दी झाली. याचवेळी माजी महापौर विकास जैन, शिवा राजपूत आणि अभिषेक जीवनवाल हे ओळखपत्र न दाखवता आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना ओळखपत्र दाखविण्याची विनंती केली; मात्र यावरून वाद वाढत गेला. आरोपानुसार, प्रवेशद्वार ढकलून जबरदस्तीने आत शिरण्याचा प्रयत्न करण्यात आला. या गोंधळात पोलीस निरीक्षक प्रमोद कठाणे आणि सहायक निरीक्षक मिरधे यांच्याशी धक्काबुक्की करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. यानंतर संबंधित व्यक्तींना बाजूला नेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
माजी महापौरसह दोघांवर गुन्हा दाखल…
मतमोजणी केंद्रावर परिस्थिती आटोक्यात आण्ण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. यात माजी महापौर विकास जैन यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. काही कार्यकर्त्यांनाही मारहाण झाल्याचा आरोप आहे. दुसरीकडे, सहायक आयुक्त सागर देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विकास जैन, शिवा राजपुत आणि अभिषेक जीवनवाल यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे आणि शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमान्वये वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वेदांतनगर ठाण्याच्या निरीक्षक प्रविणा यादव करीत आहेत.





