
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार पक्षा रोहित पवार यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत रोहित पवार यांनी संबंधितांनी माफी मागण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.
रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला अभ्यासाच्या पॅडवर चिकटवलेलं एक स्टिकर काढताना दिसत आहे. हे स्टिकर भाजपा नेते व विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांचं असल्याचंही व्हिडीओमध्ये स्पष्ट होत आहे. मात्र, हे स्टिकर काढल्यानंतर मागे पॅडवर छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र असल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकारावर रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
शिवरायांच्या फोटोवर आपलं पोस्टर चिकटवून चमकोगिरी केली जात असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत. या व्हिडीओबरोबर केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी टीका केली आहे.
Video
https://x.com/RRPSpeaks/status/2006 s=20
“महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोवर माझ्या मतदारसंघात असे स्टिकर चिकटवून ते पॅड विद्यार्थ्यांना देऊन चमकोगिरी केली जातेय. ही महाराजांची विटंबना असून ज्यांनी केलं आणि ज्यांच्यासाठी केलं ते सगळेच याला जबाबदार आहेत. याप्रकरणी संबंधितांनी तातडीने जाहीर माफी मागावी”, अशी मागणी रोहित पवारांनी आपल्या पोस्टमधून केली आहे.




