
नृत्यांगना दिपाली पाटीलने जामखेड येथील साई लॉजवर गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी दिपालीच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर भाजपचा माजी नगरसेवक संदीप सुरेश गायकवाडला पोलिसांनी अटक केली आहे. दिपालीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी बारा-साडेबाराच्या सुमारास दिपाली पाटील साई लॉजवर पोहोचली होती. तिच्या पाठोपाठ संदीप गायकवाड हा देखील त्या लॉजवर पोहोचला होता. तो दिपालीच्या रुममध्ये जात असल्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. दिपालीने आत्महत्या कर करण्यापूर्वी संदीप देखील त्या लॉजवर पोहोचला होता. त्या दोघांमध्ये नेमकं काय झालं? याबाबत माहिती समोर आलेली नाही. पण, संदीपने दिपालीला काही त्रास तर दिला नाही ना? याचा तपास पोलीस अधिकारी घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामखेड पोलीस ठाण्यात संदीप सुरेश गायकवाड याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे (कलम BNS १०८ अन्वये, गु.र.नं. ६४८/२०२५). दिपालीचे आई-वडील तसेच नातेवाईक हे कल्याण (जि. ठाणे) येथील रहिवासी आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दिपालीचा मृतदेह पुढील विधींसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून, तिचे अंत्यसंस्कार कल्याण येथे होणार आहेत. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.
दिपाली ही मुळची कल्याण येथील रहिवासी असून ती काही मैत्रिणींसोबत तपनेश्वर भागात राहत होती. सकाळी बाजारात जाऊन येते असे सांगून ती घराबाहेर पडली होती. परंतु काही तास उलटून गेल्यावरही ती परत न आल्याने मैत्रिणींनी तिला शोधायला सुरुवात केली. दिपाली ज्या रिक्षाने लॉजवर गेली होती त्या रिक्षा चालकाची चौकशी केली असता ती लॉजवर असल्याचे समोर आले. त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.



