
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १ जुलै २०२5या दिनांकाची अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी घेऊन त्याचे विभाजन करून महानगरपालिकेच्या प्रभाग निहाय मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत. विधानसभा मतदारसंघाच्या मूळ यादीत असलेल्या मतदारांचे नाव वगळणे अथवा वाढवणे याबाबतचे कोणतेही अधिकार आहिल्यानगर महानगरपालिकेला नाहीत.
उदाहरणार्थ १ : महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्येशहरातील विविध हॉटेलमध्ये असलेल्या परप्रांतीय कामगारांची नावे समाविष्ट झाल्याची हरकत घेण्यात आली आहे. सदरची नावे शहर विधानसभा मतदार संघाच्या मूळ यादीमध्ये असल्यास ती नावे महानगरपालिकेच्या मतदार यादीमधून वगळता येणार नाहीत.
उदाहरणार्थ २ : महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्येश्रीगोंदा मतदारसंघातील मतदारांच्या नावाचा समावेश असल्याची हरकत घेण्यात आली आहे. जी नावे शहर विधानसभा मतदारसंघाच्या यादीमध्ये आहेत, अशी नावे महानगरपालिकेच्या प्रारुप मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेली आहेत.
याबाबत पडताळणीचे अधिकारी महानगरपालिकेला नाहीत. तसेच, सदरची नावे महानगरपालिकेला वगळता येणार नाहीत.शहर विधानसभा मतदारसंघाची १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी महानगरपालिकेची मतदार यादी तयार करण्यासाठी वापरण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहेत.
त्यामुळे १ जुलै २०२५ या दिनांकानंतर शहर विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेली नावे महानगरपालिकेच्या मतदार यादीत समाविष्ट होणार नाहीत. तसेच, १ जुलै २०२५ या दिनांका शहर विधानसभा मतदारसंघाच्या यादीतून वगळण्यात आलेली नावेही महानगरपालिकेच्या मतदार यादीतून वगळता येणार नाहीत.



