अहिल्यानगर – आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांकरिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती गुरुवारी उत्साहात पार पडल्या. यावेळी इच्छुकांनी शक्ती प्रदर्शन करत मोठा प्रतिसाद दिला. या निमित्ताने पक्षात आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. इच्छुकांचा अहवाल वरिष्ठांना सादर करणार, असून शिवसेना निवडणुकांना अत्यंत ताकतीने सामोरी जाणार असल्याचे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, महानगर प्रमुख किरण काळे यांनी म्हटले आहे.
मुलाखतींना यावेळी इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह मोठी गर्दी केली होती. घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आपल्याच इच्छुकाला पक्षाने उमेदवारी दद्यावी यासाठी नेत्यां समोर समर्थक बाजू मांडत होते. मागील पाच वर्षात केलेल्या राजकीय, सामाजिक कार्याचा अहवाल सादर करत होते. यामध्ये युवकांचा सहभाग लक्षणीय होता. अनेक युवा उमेदवारांनी, नवीन चेहऱ्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
शिवसेना कार्यालयाने माहिती देताना सांगितले आहे की, मनपासाठी २१७, जिल्हा परिषद साठी ९८, पंचायत समितीसाठी १४१ इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आहे. या सर्व अर्जाची छाननी केली जाईल. पक्ष संघटनेसाठी केलेले काम आणि निवडून येण्याची क्षमता या आधारे चाचपणी केली जाईल. वरिष्ठांना अहवाल सादर करून पुढील आदेशाप्रमाणे निवडणुकीची तयारी केली जाईल.
किरण काळे म्हणाले, मनपा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीला महाविकास आघाडी करण्याचा प्रस्ताव आम्ही यापूर्वीच दिला आहे. त्याची एक बैठक देखील पार पडली आहे. मविआचे खा. निलेश लंके यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे. आम्ही आघाडीसाठी सकारात्मक आहोत.
मनसेशी देखील प्राथमिक चर्चा झाली आहे. मुंबईत शिवसेना, मनसेची युती होत आहे. अहिल्यानगर मध्ये देखील त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शहरात शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट अशी शिवशक्ती, भीमशक्ती आघाडी यापूर्वीच झाली आहे. अन्य काही समविचारी पक्षांशी देखील आम्ही संपर्कात आहोत. यातून अंतिम अंतिमतः काय ठरते हे पाहावे लागेल. मात्र आम्ही स्वबळाची देखील पूर्ण तयारी केली आहे, असे काळे यांनी मुलाखती नंतर बोलताना सांगितले.
राजेंद्र दळवी म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद इच्छुकांनी दिला आहे. प्रत्येक तालुक्यातील परिस्थती वेगळी आहे. ज्या ठिकाणी शिवसेना सक्षम आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त जागा लढण्यासाठी आमचा आग्रह राहणार आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी मविआ आघाडीतील घटक पक्षांना बरोबर घेऊन निवडणूक लढवावी या मताचे आम्ही आहोत. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्या, त्या तालुक्यातील स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिकांना विश्वासात घेऊन रणनीती ठरविली जाईल. मात्र, वेळप्रसंगी स्वबळावर देखील लढण्याची तयारी आम्ही केली आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला यासह सर्व घटकांना न्याय देण्यासाठी आम्हाला जि. प., पं. समितीमध्ये शिवसेनेच्या विचारांची सत्ता आणायची असल्याचे दळवी म्हणाले.





