धुळे – धुळयातील ॲक्सीस बँकेचे खाते हॅक करुन दोन कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या नायजेरियन टोळीतील पाच जणांना दिल्ली येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. या टोळक्याने बनावट कागदपत्रांच्या मदतीने उघडलेल्या वेगवेगळया राज्यांच्या बँकांमधील उघडलेली ११७ खात्यांमधील ८८ लाख ८१ हजार १७३ रुपये गोठवण्यात आले आहेत. या टोळीने देशभरातील अनेक बँकांना अशाच पध्दतीने गंडा घातल्याची प्राथमिक माहिती पुढे येत असल्याची माहिती पोलिस अधिक्षक चिन्मय पंडित व अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांनी आज दिली.
धुळयाच्या ॲक्सीस बँकेत धुळे विकास बँकेचे खाते आहे. या खात्याच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार करण्यात येत होते. हे खाते अज्ञात व्यक्तीने हॅक करुन २ कोटी ६ लाख ५० हजार १६५ रुपये परस्पर दिल्लीच्या बँकेत वळण्यात येऊन बँकेची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिस अधिक्षक चिन्मय पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केले होते. या पथकात सायबर तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. यात ॲक्सीस बँकेचे पैसे प्रथम देशातील वेगवेगळया २७ खात्यांमधे वळवण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे या खात्यांची माहिती घेऊन या खात्यांमधील रक्कम गोठवण्यासाठी संबंधीतांना ईमेलव्दारे पत्र देण्यात आले. पण भामटयांनी तातडीने हा पैसा पुढील ११७ खात्यांमध्ये वळवला. त्यामुळे चार महिन्यांपासून या खात्यांची माहिती काढून त्यातील रक्कम देखिल गोठवण्यात आली.
दरम्यान पोलिस अधिक्षक पंडित व अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील, उमेश बोरसे, सारिका कोडापे, उपनिरीक्षक हनुमंत उगले यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांना दिल्ली येथे आरोपींच्या मागावर पाठवले. खात्यांमधील काही फोन नंबरच्या मदतीने संशयितांची नावे निश्चित करण्यात आली. यातील पाच जणांचे भ्रमणध्वनींचे रेकॉर्ड तपासले असता घटनेच्या दिवशी एकाच मोबाईल टॉवरच्या रेंजमध्ये असल्याचे दिसून आले. त्यामुळे पथकाने नितिका दीपक चित्रा या तरुणीला ताब्यात घेतले. तिला धुळयात आणून चौकशी केल्यानंतर आणखी चार नावे पुढे आली. यात एका नायजेरीयन तरुणाचा समावेश होता.
दरम्यान दिल्ली येथे एक पथक या आरोपींच्या शोधासाठी ठेवण्यात आले होते. पण तब्बल १५ दिवसांनंतर ओबंचिकू जोसेप ओकोरो उर्फ प्रेस याच्यासह दीपक राजुकार चित्रा, रमनकुमार दर्शनकुमार, अवतारसिंग वरेआमसिंग यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेले मोबाईल, सिमकार्ड व लॅपटॉप जप्त करण्यात आले. तर या सर्वांकडून पैसे काढण्यासाठी उघडण्यात आलेल्या बनावट बँक खात्यांचे कागदपत्र देखिल ताब्यात घेण्यात आले.
या टोळीने अनेक बनावट नावे वापरुन चलाखीने बँकेच्या खात्यांचे केवायसी करुन घेतले होते. तर नायजेरियन तरुणाने दिल्लीतील या आरोपींना हाताशी धरुन बँकेतून पैसे काढण्याचे काम सुरु केले होते. या कामाच्या मोबदल्यात तो त्यांना लुटीतील पैशांचा काही भाग देत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान या नायजेरियन तरुणांने भारतातील अनेक बँकांना गंडा घातला असून त्याच्या समवेत आणखी काही विदेशी तरुण सहभागी असल्याचा संशय असून त्याची माहिती घेण्याचे काम सुरु झाले आहे.






