
अहिल्यानगर – नवनागापूर एमआयडीसी परिसरातील जमीन खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून एका व्यापाऱ्याची तब्बल 70 लाख रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी वडगाव गुप्ता (ता. अहिल्यानगर) येथील चौघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू ऊर्फ सोनल सुभाष निकम (वय 38, रा. वड्गाव गुप्ता) असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून त्यांनी शनिवारी (22 नोव्हेंबर) फिर्याद दिली.
आहे. बबन बाबुराव गुडगळ व त्याचे तीन मुले दत्ता गुडगळ, छबू गुडगळ आणि शंकर गुडगळ (सर्व रा. वडगाव गुप्ता, ता. अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. संशयित आरोपींनी सन 2022 पासून 28 एप्रिल 2025 या कालावधीत फिर्यादीचा विश्वास संपादन करून नवनागापूर येथील गट क्रमांक 101/1 अ मधील जमीन खरेदी खत करून देण्याचे आश्वासन दिले.या व्यवहारासाठी त्यांनी फिर्यादींकडून वेळोवेळी चेक व रोख स्वरूपात एकूण 70 लाख रूपये स्वीकारले.
मात्र दीर्घकाळ उलटूनही ना जमीन खरेदीची प्रक्रिया झाली, ना र्कोणतेही खरेदी खत देण्यात आले. खताबाबत वारंवार विचारणा केल्यावर संशयित आरोपींनी फिर्यादींना शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, अशी माहिती फिर्यादींनी पोलिसांना दिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अद्याप एकाही संशयित आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलीस अंमलदार दीपक जाधव करीत आहेत.


