पंकजा मुंडेंचे पीए अनंत गजेंना अटक, रात्री 1 वाजता पोलिसांना शरण

    16

    गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणात पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांना अटक करण्यात आली आहे. वरळी पोलिसांनी रविवारी रात्री 1 वाजता अनंत गर्जे यांना अटक केली. गेल्या काही तासांपासून अनंत गर्जे हे फरार होते. अखेर रात्री 1 वाजता गर्जे यांनी वरळी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी अनंत गर्जे यांना अटक केली. अनंत गर्जे यांना सोमवारी न्यायालयात हजर केले जाईल. त्यावेळी अनंत गर्जे यांची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. यावेळी पोलीस न्यायालयात नेमकी काय माहिती देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तर अनंत गर्जे यांच्या वकिलांकडूनही जामीन मिळवण्यासाठी युक्तिवाद होईल. त्यामुळे आज न्यायालयात गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणाबाबत आणखी कोणती माहिती समोर येणार, हे बघावे लागेल. वरळी पोलिसांनी गौरी पालवे गर्जे आत्महत्येप्रकरणी रविवारी भारतीय न्याय संहिता कलम 108, 85, 352 आणि 351 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे-आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघावर त्रास देणे, अपमान करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

    या सगळ्याबाबत अनंत गर्जे यांच्याकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, पत्नीच्या दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणाऱ्या घटनेनंतर अनंत गर्जे यांनी दिनांक 24 रोजी मध्यरात्री वरळी पोलिस स्थानकात हजर झाले. कायद्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय्य रितीने पार पडावी, यासाठी अनंत गर्जे स्वखुशीने पोलिसांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. तपासाला सहकार्य करण्यासाठी त्यांनी स्वतःहून पोलिसांसमोर हजर होण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा आणि सत्य जनसमोर यावे, यासाठी ते तपास यंत्रणांना आवश्यक ती सर्व माहिती आणि मदत करायला तयार आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.

    दरम्यान, या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. गौरी गौरी पालवे यांच्या मृत्यूनंतर तिच्या आईवडिलांना वेदना सहन कराव्या लागत आहेत. गौरीने गळफास लावून घेतल्यानंतर अनंत गर्जे यांनी तिचा मृतदेह नायर रुग्णालयात आणला. त्यावेळीच पोलिसांनी अनंत गर्जे यांना अटक का केली नाही. त्यावेळी त्यांना सोडून का देण्यात आले, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here