
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या रिक्त झालेल्या चेअरमन पदासाठी पदासाठी आज सोमवारी (दि.24) घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत माजी आमदार आ. चंद्रशेखर घुले पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. सकाळी ११ वाजता जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची अधिकृत बैठक पार पडली.
यापूर्वी सकाळी ९ वाजता नगरमधील राज पॅलेस येथे संचालकांची अनौपचारिक चहापान बैठक झाल्याचे समजते. या बैठकीत अध्यक्षपदासाठी घुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले, त्यानंतर अधिकृत बैठकीत त्यांची निवड बिनविरोध पार पडर्ली.
या निवडीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पडद्यामागील भूमिका निर्णायक ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. घुले हे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचे सासरे असल्याने, काळे-विखे यांच्यातील सध्याचे राजकीय समन्वयदेखील या निवडीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा घटक ठरल्याचे मानले जात आहे.
चेअरमन निवडीसाठी मतदानाधिकार असलेल्या संचालकांमध्ये मोनिका राजळे,, आण्णासाहेब शिंदे, अंबादास पिसाळ, अमोल राळेभात, आशा तापकीर, भानुदास मुरकुटे, सीताराम गायकर, अरुण तनपुरे, चंद्रशेखर घुले, राहुल जगताप, आशुतोष काळे, प्रशांत गायकवाड, अनुराधा नागवडे, अमित भांगरे, गीतांजली शेळके, माधवाव कानवडे, करण ससाणे, गणपतराव सांगळे व शंकरराव गडाख या सदस्यांचा समावेश आहे.
निवड प्रक्रियेपूर्वी अनेक संचालकांनी पुढील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने विखे पाटील यांना सहकार्य राखणे आवश्यक असल्याने, घुले यांच्या समर्थनाचा कल स्पष्ट दिसत होता.
बिनविरोध निवड झाल्यानंत्र आ. चंद्रशेखर घुले पाटील यांनी विश्वास व्यक्त केल्याबद्दल संचालक मंडळाचे आभार मानले, तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.



