
अहिल्यानगर – महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्याच्या कडेला स्टॉल लाऊन, हातगाड्या लाऊन विक्री करणाऱ्या सर्व प्रकारच्या विक्रेत्यांना महानगरपालिका रस्ता बाजू शुल्काची आकारणी करते. जुन्या ठेकेदार संस्थेचे काम बंद केल्याने महानगरपालिकेच्या मार्केट विभागाकडून ही शुल्क वसुली सुरू. आता महानगरपालिकेने या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवून खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे. २५ नोव्हेंबरपासून या शहरात या संस्थेमार्फत रस्ता बाजू शुल्क व स्लॉटर शुल्क वसुली करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
शहरातील सर्व भाजी विक्रेते, फळ विक्रेते व महानगरपालिकेच्या रस्त्यावर विविध प्रकारचे साहित्य, पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून ही शुल्क वसुली केली जाते. या शुल्क वसुर्लीचे काम मे. वंशिका एन्टरप्रायजेस यांना एक वर्षासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावरील सर्व विक्रेत्यांनी रस्ता बाजू शुल्क व स्लॉग्टर शुल्क या संस्थेला देऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून सन २०२३-२०२४ मध्ये १३.५० लाख, सन २०२४-२०२५ मध्ये १० लाख रुपये शुल्क वसुली झाली होती. ठेकेदार संस्थेकडून वर्षाकाठी सुमारे २० लाख रुपये जीएसटीसह उत्पन्न मनपाला मिळणार आहे. रस्त्यावरील ५ x ४ फुटापर्यंत जागेतील विक्रेत्यांसाठी १० रुपये प्रति दिवस व त्यापुढील प्रति चौरस फुटासाठी १ रुपये व सायंकाळी विक्रेत्यांसाठी १५ रुपये प्रति दिवस व त्यापुढील प्रति चौरस फुटासाठी १ रुपये तसेच स्लॉटर शुल्क प्रति नग ५ रुपये असे निश्चित आहे. यापेक्षा अधिक रकमेची मागणी झाल्यास विक्रेत्यांनी महानगरपालिकेकडे तक्रार करावी. जादा रक्कम घेतल्यास कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.




