
श्रीक्षेत्र अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा कलश पूर्ण होऊन एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हिवरे बाजार येथे आज दुपारी १२.१० वाजता शुभमुहूर्तावर धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले.
दि.२२ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास जगातील निवडक ८००० मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले होते. त्यात हिवरे बाजारचे ग्रामविकासाचे शिल्पकार पद्मश्री पोपटराव पवार यांना विशेष निमंत्रणाचा मान मिळाला होता.
श्रीराम न्यास, अयोध्या कडून जगातील निवडक ३०० भाग्यवंतांना श्रीरामलल्लाच्या मूर्तीच्या निर्मितीमध्ये वापरलेल्या पवित्र शिलांशांचे वितरण करण्यात आले. त्यापैकी एक पवित्र शिलांश हिवरे बाजारला प्राप्त झाला असून, अखंड हरीनाम सप्ताहाच्या मुहूर्तावर त्याची श्रीराम मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गावाने साकारलेल्या सर्वसमावेशक विकासाच्या रामराज्याला ही घटना प्रतीकात्मक सलाम असल्याचे मानले जात आहे.
कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकर्ते रविंद्र मुळे, विभाग संपर्क कार्यकर्ते घनश्याम डोडीया व सचिन सोमवंशी यांनी पद्मश्री पवार यांना निमंत्रण व शिलांश प्रदान करणारे तेच मान्यवर आजच्या पूजन सोहळ्यातही सहभागी झाले.
यावेळी बोलताना घनश्याम डोडीया म्हणाले, “धर्मध्वज पूजनाच्या या पवित्र प्रसंगी हिवरे बाजारला भेट देणाऱ्या पर्यटकांनी एक संकल्प केला पाहिजे – देशभरात हिवरे बाजारसारखी अनेक ग्रामराज्ये निर्माण करण्याची प्रेरणा घेण्याचा. मंदिरात ठेवलेला हा शिलाखंड हे हिवरे बाजारच्या रामराज्याचे जिवंत प्रतीक आहे.
“कार्यक्रमास सरपंच विमलताई ठाणगे, चेअरमन छबूराव ठाणगे, उपाध्यक्ष रामभाऊ चत्तर, एस.टी. पादीर (सर), रोहिदास पादीर, महिला मंडळ, शिक्षक, विद्यार्थी (जि.प. प्रा. शाळा व यशवंत माध्यमिक विद्यालय) तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. हिवरे बाजारच्या आदर्श ग्रामविकास परंपरेत आजचा हा पूजन सोहळा आणखी एक प्रेरणादायी अध्याय ठरला.



