
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा ‘ट्रॅप’उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर पैसे लागतील” या नेहमीच्या सवयीची शेवटी किंमत तीन सरकारी कर्मचाऱ्यांना चुकवावी लागली. पारनेर पंचायत समिती कार्यालयात रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी मागितलेली ६५ हजार ६०० रुपयांची लाच स्वीकारताना उपअभियंता अजय विठ्ठल जगदाळे, रोजगार हमी योजना पॅनल तांत्रिक अधिकारी विलास नवनाथ चौधरी आणि तांत्रिक सहाय्यक दिनकर दत्तात्रय मगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.दि.२० नोव्हेंबरच्या सायंकाळी पारनेर पंचायत समितीत झालेल्या या कारवाईने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून तिघांवर पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदारांच्या नातेवाईकांची ठेकेदार संस्था20’मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते योजना’ अंतर्गत कारेगाव ते वाघोबा रस्ता खडीकरण व मजबुतीकरणाचे काम करत होती. या कामाचे मोजमाप, बिल तयार करणे आणि मंजुरीसाठी पाठविण्याची जबाबदारी उपअभियंता जगदाळे व तांत्रिक सहाय्यक मगर यांच्यावर होती.
दरम्यान, विलास चौधरी यांनी तक्रारदारांना सरळ शब्दांत सांगितले, “तिघांसाठी मिळून ६५ हजार ६०० रुपये द्या, तरच बिल पुढे जाईल.” तक्रारदारांनी ही बाब तातडीने नगरच्या एसीबीकडे नोंदवली. एसीबीच्या निर्देशानुसार पंचांसमक्ष पडताळणीदरम्यान चौधरी यांनी पुन्हा एकदा लाच मागणीची पुष्टी केली. कामाची बिले तयार करून मंजुरीसाठी पाठवायची असल्यास ६५ हजार ६०० रुपये द्यावेच लागतील, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आणि स्वीकारण्याची तयारीही दर्शवली.
२० नोव्हेंबरला जाळ्यात अडकले अधिकारी
योजना शाबूत ठेवून एसीबीच्या पथकाने पारनेर पंचायत समिती कार्यालयात सापळा रचला. तक्रारदारांकडून पंचासमक्ष ६५ हजार ६०० रुपयांची रक्कम घेऊन विलास चौधरी यांनी ती स्वतःसाठी, उपअभियंता जगदाळे आणि दिनकर मगर यांच्या वतीने स्वीकारताच एसीबी पथकाने रंगेहात पकडले. या तिघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७ व १२ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. संतोष शिंदे, पो.कॉ. रवींद्र निमसे, पो.कॉ. बाबासाहेब कराड, पो.कॉ. हारून शेख या पथकाने यशस्वी केली.





