
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ. आशुतोष काळे यांनी आगामी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांना उमेदवारी देऊन राजकीय वर्तुळात ‘मास्टरस्ट्रोक’ मारला आहे. ओबीसी समाजातील अनुभवी व्यक्तिमत्त्वाला उमेदवारी देऊन आमदार काळे यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील भाजप (कोल्हे गट) पुढे मोठे आव्हान उभे केल्याचे बोलले जात आहे. आ. आशुतोष काळे यांनी गुरुवारी काका कोयटे यांचा अधिकृत पक्षप्रवेश घडवून आणला आणि त्याचवेळी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली. या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नगराध्यक्षपदाचे इच्छुक उमेदवार कृष्णा आढाव, मंदार पहाडे, सुनील गंगुले आणि वीरेन बोरावके यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी आ. काळे म्हणाले, काका कोयटे यांना समाजकारण, राजकारण आणि सहकार क्षेत्राचा गाढा अभ्यास आहे.
त्यांच्या संमतीनेच सर्वानुमते नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. कोणताही इच्छुक नाराज झालेला नाही. नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे यांनी यावेळी बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. यापूर्वी माजी खा. स्व. शंकरराव काळे यांच्या पाठबळाने त्यांच्या पत्नीला नगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती. एका ज्योतिषाने मला राजकारणातील 50 वर्षानंतर राजयोग येईल, असे सांगितले होते. त्या गोष्टीला आज बरोबर 50 वर्षे झाली आहेत. मी नगराध्यक्ष होणारच असा मला आत्मविश्वास आहे. आ. आशुतोष काळे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने कोपरगाव शहर राज्यात एक नंबरला नेण्याची ग्वाही मी देतो. ‘कोपरगाव, कोपरगाव आणि कोपरगाव’ हाच माझा ध्यास असेल. शहरातील नियोजनाचा अभाव आणि बस स्टँड, स्विमिंगपुल यांसारख्या कामांमध्ये झालेल्या त्रुटींवरही त्यांनौ टीका केली.
काळे यांच्या मास्टर स्ट्रोकमुळे कोल्हे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि युवक नेते विवेक कोल्हे यांनी मोठा गाजावाजा करून प्रभाग क्रमांक तीनमधून जाहीर केलेले उमेदवार जनार्दन कदम यांनी अचानक काका कोयटे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काळे यांनी जाहीर केलेला उमेदवार थेट आपल्या पक्षात खेचून आणल्याने कोल्हे गटावर निवडणुकीच्या तोंडावर मोठी नामुष्कीची वेळ आली आहे.



