सिस्पे, इन्फिनाईट बिकन घोटाळा, नगर तालुक्यातील दोघा एजंटला पोलिसांनी उचलले

    64

    अहिल्यानगर – इन्फिनाईट बिकन कंपनीच्या गुंतवणूक फसवणूकप्रकरणात तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील दोघा एजंटांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी (3 नोव्हेंबर) पहाटे ताब्यात घेऊन अटक केली आहे. अंबादास जाधव (वय 50, रा. दरेवाडी, ता. अहिल्यानगर) व बाळासाहेब हिंगे (वय 45, रा. दहिगाव साकत) अशी अटक केलेल्या एजंटांची नावे असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी (6 नोव्हेंबरपर्यंत) सुनावली आहे, अशी माहिती तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी दिली.

    इन्फिनाईट बिकन, ट्रेड्स इन्व्हेस्टमेंट, सिस्पे आदी कंपन्यांनी केलेल्या फसवणुकीसंदर्भात श्रीगोंदा, तोफखाना आणि सुपा पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. या सर्व प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणात एक कोटी 69 लाख 50 हजार रूपयांची फसवणूक झाल्याची नोंद असून शिक्षिका अनामिका शिंदे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात जाधव आणि हिंगे यांना पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादीला इन्फिनाईट बिकन व ट्रेड्स इन्व्हेस्टमेंट या कंपन्यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी गुंतवणूक केली होती.

    कंपनीचे सीईओ अगस्त मिश्रा व इतर संचालकांनी गुंतवणूकदारांना 10 ते 12 टक्के परतावा मिळेल, तसेच कंपनी सेबीकडे नोंदणीकृत असून शेअर बाजारातून नफा मिळवून गुंतवणूकदारांना नफ्यातील हिस्सा दिला जाईल, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. मात्र, यावर फिर्यादीसह अनेक गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करण्यात आली. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेकडून सर्व संबंधित गुन्ह्यांचा एकत्रित तपास सुरू असून संचालक मंडळाबरोबर एजंटदेखील या प्रकरणांत आरोपी ठरत आहेत त्यामुळे एजंटांच्या धरपकडीसाठी पोलिसांन मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान एजंट जाधव व हिंगे हे पोलिसांच्या रडारवर होते. सोमवारी पहाटे अहिल्यानगर परिसरातून त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयासमोर हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

    जबाब देण्याचे आवाहन सिस्पे, ट्रेड्स, इन्फिनाईट बिकन कंपन्यांमधील गुंतवणूक घोटाळ्यांप्रकरणी आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संशयित आरोपींच्या विविध बँक खात्यांतील सुमारे 55 कोटी रूपयांची रक्कम गोठवली आहे. आरोपींच्या मालमत्ता, बँक खाती आणि वाहनांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून ‘एमपीआयडी’ अंतर्गत प्रस्ताव तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच, या कंपन्यांमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली आहे, अशा सर्व गुंतवणूकदारांनी आपल्या आर्थिक गुंतवणुकीसंदर्भातील कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेत हजर राहून जबाब देण्याचे आवाहन तपासी अधिकारी निरीक्षक डॉ. गोर्डे यांनी केले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here