सध्या AI च्या युगात मुलींवर विविध प्रकारचे अन्याय, अत्याचार, फसवणूक, प्रेमप्रकरण झालेल्याच्या बातम्या आपल्याला वाचायला-पाहायला मिळतात, त्यामुळे मुलींची सुरक्षा आणि त्यांचे सक्षमीकरण हे ज्वलंत आणि अतिशय निकडीचे बनले आहे. मुलींची सुरक्षितता वाढण्यासाठी मुलींना केवळ कायदेशीररीत्या संरक्षण देऊन भागणार नाही. तर मुलींचे सक्षमीकरण करताना कुटुंबातील संवाद, संस्कार, सकारात्मक बदल, त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास महत्वाचा आहे. असे प्रतिपादन पदमश्री डॉ. पोपटराव पवार यांनी नरकचतुर्दशीच्या दिवशी किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करताना केले.
यावेळी बोलताना त्यांनी मोबाइलचा गैरवापर, नवे करियर – नवे मित्र, शालेय प्रवास यातून स्वतःला सुरक्षित ठेवा. भविष्यातील एकच चूक आयुष्यभर पश्चाताप करायला लावते तर एकच चांगली संधी आयुष्य बदलवते. त्यामुळे मुलींनो फसव्या जगात चेहेरे सुंदर दिसतात भुलून जाऊ नका, चुका दुरुस्त करून भवितव्य घडवा. असा सल्ला दिला. यावेळी एस. टी. पादीर, सहदेव पवार, दत्तात्रय ठाणगे, संजय पवार, राजू सहादू ठाणगे मेजर, मुरलीधर अमृते, गावातील व परिसरातील तरुण मुली व महिला पालक तसेच शाळेचे शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक गावांमध्ये दखल घेतली पाहिजे. कुठलीही मुलगी किंवा स्त्री ज्यावेळी अडचणीत असेल त्यावेळी मदत केली पाहिजे.सुरक्षित मुली, सशक्त मुली, सबल मुली ही काळाची न्यायोचित आणि कालोचित मागणी आहे, हे त्रिवार सत्य आहे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि सशक्तीकरणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न व संघर्ष होणे गरजेचे आहे. मुलींच्या फक्त अभ्यासातल्या विषयांकडे लक्ष देण्यापेक्षा भावनिक बुद्धीकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे प्रत्येक मुलीला चांगल्या संस्कारांचे बाळकडू कुटुंबातूनच मिळत असते. याशिवाय वाईट संस्कारांचेही बाळकडू कुटुंबातून मिळू शकते. याची पुरेपूर जाण सुजाण पालकांनी ठेवली पाहिजे. पालकांचे सदगुण मुलांमध्ये आल्याशिवाय राहत नाही आणि दुर्गुण सुद्धा. त्यामुळे पालकांनी सावध राहणे गरजेचे आहे. प्रत्येक आईवडिलांना आपले मुलं प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी व्हावे त्यांचा भविष्यकाळ चांगला असावा असे वाटते.
परंतु त्याची तयारी प्रामुख्याने कुटुंबातूनच होत असते हे सुजाण पालकांनी विसरून चालणार नाही. पालकांमधील सकारात्मकता मुलांमध्ये येत असते. त्यामुळे पालकांचे विचारही सकारात्मकच असावेत.महिला, तरुणी, विद्यार्थिनी यांची सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड, विविध समस्या. शाळा, महाविद्यालय या ठिकाणी होणारा त्रास कमी व्हावा, मुलींना सुरक्षित वाटावे यासाठी आता मुलींनी एक पाऊल पुढे टाकत आपल्या शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवणी, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, सोसायट्या, गावांमध्ये काही समस्या असल्यास, संशयित फिरत असतील ती माहिती देण्याची जबाबदारी आहे, तरच अप्रिय घटनांना आळा बसेल.
त्यामुळे फसवणूकीच्या, छेडछाडीच्या घटना टळू शकतील असेही पदमश्री डॉ. पोपटराव पवार यांनी सांगून मुलींच्या भविष्याचा अचूक वेध घेतला.




