तोतया लष्करी अधिकारी महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, निघाली अवघी १० वी पास

    65

    छत्रपती संभाजीनगर – मागील २४ वर्षांपासून भारतीय सैन्य दलात कॅप्टन असल्याचे सांगत पंचक्रोशीत वावरणाऱ्या आणि विविध संस्था-संघटनांकडून ‘महिला लष्करी अधिकारी’ म्हणून सन्मान मिळविलेल्या एका तोतया कॅप्टन महिलेला ११ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबादजवळच्या धरमपूर येथे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. लष्कराच्या गुप्तचर खात्याला मिळालेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली.

    रुचिका अजित जैन (वय ४८) असे या महिलेचे नाव असून, धरमपूर येथे गावाजवळच ती एका आलिशान घरात राहत असे. तेथेच पद्मावती देवीचे मंदिर बांधून तिने आश्रमही सुरू केला होता. एकाचवेळी ती लष्करातील कॅप्टन आणि हात पाहून भविष्य सांगणारी ‘रुचिका माँ’ म्हणून वावरायची.

    एक महिला लष्करात कॅप्टन असल्याचे भासवत लष्करी गणवेशात पंचक्रोशीत वावरत असल्याची माहिती लष्कराच्या गुप्तचर खात्याला तीन महिन्यांपूर्वी मिळाली. तिचे छायाचित्रही हाती लागले.

    त्यांच्या प्राथमिक तपासात रुचिका ही बोगस लष्करी अधिकारी असल्याचे समोर आले. त्यानंतर रुचिका जैनवर बारकाईने नजर ठेवण्यात आली. ११ सप्टेंबर रोजी लष्करी गुप्तचर खाते आणि दौलतबाद पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत तिच्या कृत्याचा पर्दाफाश केला.

    रुचिकाच्या आश्रमसदृश आलिशान घरात ‘कॅप्टन’ अशी नोंद असलेले ओळखपत्र, एक रायफल, एक पिस्तूल, लष्कराचा कॉम्बॅट युनिफॉर्म, दंडावर लावायचा स्पेशल फोर्स लिहिलेला बॅज, कॅप्टन रँकचे तीन स्टार, कॉम्बॅट शूज, कॉम्बॅट टोपी, कमरेचे लष्करी पट्टे, रुचिका जैन लिहिलेली नेमप्लेट, लष्करी गणवेशातील फोटो आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तसेच छत्रपती संभाजीनगर, परिसरातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने तिला देण्यात आलेली प्रमाणपत्रे, सन्मानचिन्हे आणि युद्धातील छायाचित्रे हस्तगत करण्यात आली. दौलताबाद पोलिसांनी तिला अटक केली असून, तिची कसून चौकशी करण्यात येत आहे.

    जेव्हा लष्करी गुप्तचर आणि पोलिस रुचिकाच्या घरी धडकले, तेव्हा तिने आकांडतांडव सुरू केले. ‘मला पंतप्रधान कार्यालयाने स्पेशल नियुक्ती दिली आहे. माझ्यावर कसली कारवाई करता? कारवाई करायची असेल, तर तिकडे सीमेवर जा’, असे ती या पथकाला म्हणाली. तिला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू करण्यात आली. त्यात ती प्रत्यक्ष दहावी पास असल्याचेही समोर आले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here