
बीडमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बीड शहरात राहणाऱ्या एका महिलेने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यावर अत्याचाराचा आरोप केला आहे. पदाधिकाऱ्याने १६ वर्षांपासून अत्याचार केल्याचे महिलेने म्हटले आहे. बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पदाधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला शिक्षिका असल्याची माहिती समोर आली आहे.
मुलाला नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून १६ वर्ष अत्याचार केल्याचा आरोप महिलेने पदाधिकाऱ्यावर केला आहे. पैसे घेऊन फसवणूक केल्याचा उल्लेख देखील महिलेच्या तक्रारीत करण्यात आला आहे. पोलिसांकडे गेलीस तर तुला मारुन टाकेन, माझी वरपर्यंत ओळख आहे, असे म्हणत त्याने धमकावल्याचेही महिलेने म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पदाधिकारी नारायण याच्या विरोधात एका महिला शिक्षिकेने फसवणूकीचा आरोप केला आहे. ‘तुझ्या मुलाला नोकरी लावून देतो असे म्हणत नारायणने २००६ ते २०२२ अशा प्रकारे १६ वर्षे माझ्यावर अत्याचार केला. तुला पुण्यात फ्लॅट घेऊन देतो, असे म्हणत त्याने एक कोटी दहा लाख रुपये घेतले’ असेही महिलेने म्हटले आहे.
बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये नारायणच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो बीडमधील नेकनूरच्या जिल्हा परिषदेतील माजी सदस्य आहे. याशिवाय नारायण हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीडचे आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचेही म्हटले जात आहे.



