
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनामुळे शहरातील विशेषतः दक्षिण मुंबईतील दैनंदिन व्यवहार मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले होते. दक्षिण मुंबईतील प्रमुख रस्ते, बाजारपेठा, हॉटेल व्यवसाय आणि कार्यालयीन भागांवर याचा थेट परिणाम झाला. यात व्यापाऱ्यांचे सुमारे १०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शाह यांनी बुधवारी व्यक्त केला.
आंदोलकांच्या गाड्या रस्त्यावरच दुतर्फा लावण्यात आल्या होत्या, तर पोलिसांनी वाहतूकही बंद केली होती. परिणामी ऐन सणासुदीच्या काळात शनिवार-रविवारी ग्राहकांची वर्दळ प्रचंड मंदावली आणि अनेक मॉल्स, हॉटेल्स, दुकाने बंद ठेवण्यात आली होती.