
संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात, शनिवार, दि. 16 ऑगस्ट 2025 रोजी संग्राम बापू भंडारे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. या कीर्तनात संग्राम बापू सातत्याने राजकीय विधाने करत होते, त्यावर उपस्थितांनी ‘महाराज आपण अभंगावर बोला’ असे सांगितले त्यानंतर चिडलेल्या महाराजांनी विनंती करणाऱ्याला सायको म्हटले व त्यातून वाद उफाळून आला, याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस स्थानकात 14 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिकतेच्या नावावर राजकारण करून घुलेवाडी मध्ये अशांतता निर्माण करण्याचा काही प्रवृत्ती करत असून शांतता भंग करू नका असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
घुलेवाडी मधील ग्रामस्थांनी संगमनेर पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक देशमुख यांची भेट घेऊन दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा मात्र धार्मिकतेच्या नावावर राजकारण नको याची मागणी केली. याचबरोबर महाराजांची खोटी गाडी दाखवून तोडफोड केल्याचे दाखवले प्रत्यक्षात असे काही घडली नसून अशा अफवा पसरवणाऱ्या विरुद्ध ही कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी सिताराम राऊत, राजू खरात, आनंद वरपे, भास्कर पानसरे, अंकुश ताजने, गजेंद्र अभंग, किशोर टोकसे, भाऊसाहेब पानसरे, मच्छिंद्र ढमाले, मनीष राक्षे यांच्यासह घुलेवाडी मधील कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी त्यांनी म्हटले की घुलेवाडी येथे रात्री संग्राम बापू भंडारे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. महाराज सातत्याने या कीर्तनात जातीय तेढ निर्माण होईल अशी विधाने करत होते,
त्यावर उपस्थितांमधून वारंवार महाराज आपण अध्यात्मावर बोला असे सांगण्यात आले. अखेर कीर्तन ऐकणाऱ्या निलेश गायकवाड यांनी महाराज अभंगावर बोला अशी विनंती त्यांना केली, त्यानंतर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
गावातील ज्येष्ठांनी पुढाकार घेऊन हा गोंधळ शांत केला, मात्र महाराजांनी अचानक प्रश्न विचारणाऱ्या गायकवाड यांना उभे करून, अभंग गाऊन दाखव असे सांगितले त्यावर गायकवाड यांनी महाराज मी श्रोता आहे असे म्हटले. मात्र त्यानंतर महाराजांनी तू सायको आहे तुझे मानसिक संतुलन बिघडलेले आहे असे विधाने करायला सुरुवात केली. त्यामुळे उपस्थित गावकऱ्यांनी उभे राहत महाराज तुम्ही अध्यात्मावर बोललं पाहिजे, असं म्हणायला सुरुवात केली, त्यानंतर गोंधळ निर्माण झाला आणि मध्येच कीर्तन थांबले.
विरोधानंतर महाराज निघून गेले, वातावरण ही शांत झाले, मात्र त्यानंतर पुन्हा भंडारे महाराजांचे समर्थक असलेले काही कार्यकर्ते तिथे आले व त्यांनी वाद घालायला सुरुवात केली. उपस्थित महिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली, घोषणा देऊन, महिलांच्या अंगावर टोप्या फेकण्यात आल्या. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद मिटवला.
पोलिसांनीच महाराजांना चंदनापुरी घाटापर्यंत सोडल..
महाराजांवर जीवघेणा हल्ला झाला, त्यांची गाडी फोडली, काचा फोडल्या अशी खोटी फिर्याद दिली गेली आहे मात्र असे काहीही झाले नाही. कारण पोलीस संरक्षणामध्ये पोलिसांनीच महाराजांना चंदनापुरी घाटापर्यंत सोडवले आहे त्यामुळे असा कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. सोशल मीडियावर या बाबतच्या सगळ्या खोट्या अफवा पसरवल्या जात आहे. अशी कोणतीही घटना झाली नाही याला पोलीस प्रशासनच साक्ष आहे.
धार्मिक व्यासपीठावरून राजकारण
दरम्यान धार्मिक व्यासपीठावरून राजकारण करण्याची वृत्ती सध्या वाढत आहे, राजकीय अजेंडा पेरण्यासाठी अनेक मंडळी कीर्तनांचा वापर करतात त्यातून या परंपरेला मोठे गालबोट लागलेले दिसते. कायद्याचा वापर करून, खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न संगमनेरात वाढलेला आहे. अनेक ज्येष्ठ मंडळींनी यावेळी घुलेवाडीत कीर्तनाच्या माध्यमातून सुरू झालेल्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली, महाराजांनी अध्यात्माचा विचार सांगायला हवा त्यांनी राजकारणात पडू नये अशी भूमिकाही गावातील राजकारण विरहित नागरिकांनी व महिलांनी मांडली.
सोशल मीडिया चुकीच्या अफवा
घुलेवाडी मध्ये जास्तीत जास्त अशांतता निर्माण कशी होईल याकरता काही प्रवृत्तींनी महाराजांची खोटी गाडी दाखवली तिची तोडफोड झालेली दाखवली प्रत्यक्षात ही गाडी महाराजांची नव्हती. सोशल मीडियावर अशा चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात असून त्यामुळे समाजामध्ये अशांतता निर्माण होत आहे यामुळे पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून अशा खोट्या पोस्ट टाकणाऱ्या व गैरसमज निर्माण करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली.
पोलिसांवर दबाव कोणाचा ?
दरम्यान भंडारे महाराज यांनी देखील आपली बाजू मांडण्यासाठी प्रकाशित केलेल्या व्हिडिओत, गाडी फोडली, जीवघेणा हल्ला झाला अशा कोणत्याही बाबींचा उल्लेख केलेला नाही, असे असताना पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरून हा खोटा गुन्हा दाखल करून घेतला असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे?
घुलेवाडी अशांत करण्याचा प्रयत्न
घुलेवाडी हे अठरापगड जातींचे आणि विविध धर्मीयांचे निवासस्थान आहे, आजवर कायम गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या या गावाच्या शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो आहे. धार्मिक आणि जातीय द्वेष पसरवून येथील सलोखा संपुष्टात आणण्याचा डाव काही मंडळींनी आखलेला आहे.