
शासकीय योजना, विभागांची माहिती, ऑनलाईन परवानग्या, दाखल्यांसाठी मिळणार सुविधा
मोबाईलवरून घरबसल्या तक्रार नोंदवता येणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
अहिल्यानगर – महानगरपालिकेचे प्रशासकीय कामकाज ई ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून बहुतांश प्रमाणात ऑनलाईन स्वरूपात सुरू झाले आहे. आता महानगरपालिकेने नागरिकांना ऑनलाईन सेवा व सुविधा, तसेच घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाईन तक्रार नोंदवण्यासाठी “व्हॉट्स अॅप चॅटबोट” च्या माध्यमातून सेवा उपलब्ध करून दिली आहे. सोमवार ४ ऑगस्टपासून ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत नागरिकांना आवश्यक असलेल्या विविध सेवा, सुविधा व माहिती ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी पुढाकार घेऊन महानगरपालिकेच्या चॅटबोटसाठी 9175675232 हा क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे म्हणाले की, अहिल्यानगर महानगरपलिकेतर्फे महानगरपालिका हद्दीमधील नागरिकांसाठी विविध प्रकारची विकास कामे केली जातात. नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा देण्यात येतात. नागरिकांसाठी विविध प्रकारचे उपक्रमही राबविण्यात येतात. या कामाची, सेवांची व उपक्रमांबाबतची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी विविध समाज माध्यमांचा वापर केला जात आहे. वृत्तपत्र, रेडिओ, टीव्ही चॅनेल, वेबसाईट, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स (टविटर), यूट्यूब चॅनेल, व्हॉट्स अॅप चॅनेल आदींचा वापर सध्या महानगरपालिका करत आहे.
सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल असून त्यामध्ये सर्वांत प्रभावी माध्यम म्हणून व्हॉट्स अॅपचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी व लवकरात लवकर नागरिकांशी संवाद साधण्यासाठी, नागरिकांच्या तक्रारीचे लवकरात लवकर निरसन करण्यासाठी व्हॉट्स अॅप चॅटबोट सुरू करण्यात येत आहे. या माध्यमातून तक्रारी, महानगरपालिकेमार्फत देण्यात येणा-या विविध सेवा, आपत्कालीन सेवा, सामाजिक माध्यमे, शासन स्तरावरील योजना, रुग्णालय व आरोग्य सेवा आदींची माहिती व सेवा उपलब्ध आहे. याचा फायदा घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी नागरिकांना केले आहे.
नागरिकांनी “व्हॉट्स अॅप चॅटबोट”चा वापर करण्यासाठी 9175675232 या मोबाईल क्रमांकावर HI मेसेज टाईप करून पाठवल्यास त्यांना मुख्य सूची असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक कैल्यास त्यांना तक्रार निवारण, नागरी सेवा व सुविधा, विभागाचे माहिती, आपत्कालीन सेवा, सामाजिक माध्यमे, शासन स्तरावरील योजना, रुग्णालये व आरोग्य असे दिसतील. तक्रार निवारणमध्ये नागरिकांना विविध प्रकारच्या तक्रारींची पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. पाणीपुरवठा, घनकचरा, रस्ते, वृक्षतोड आदींबाबत नागरिक आपली तक्रार नोंदवू शकतात.
नागरी सेवा व सुविधामध्ये नागरिकांना विविध प्रकारच्या सेवांची माहिती मिळण्यास मदत होईल. महाराष्ट्र लोकसेवा हक्क, जन्म- मृत्यू प्रमाणपत्र, मांडव परवानगी, होर्डिंग, बॅनर परवानगी आदींची माहिती मिळेल. विभागाची माहिती यामध्ये नागरिकांना अहिल्यानगर महानगरपालिकेतील विविध विभागांची माहिती मिळणार आहे. आपत्कालीन सेवा यामध्ये नागरिकांना अहिल्यानग्र महानगरपालिकेतील आपत्कालीन सेवा संबंधित विभाग प्रमुख यांचा संपर्क क्रमांक देण्यात आलेला असून त्यावर ते आपत्कालीन वेळेस त्यांना संपर्क करू शकतील. सामाजिक माध्यमे यामध्ये महानगरपालिकेची विविध प्रकारची सामाजिक माध्यमे (उदा. फेसबुक, इंस्टाग्राम इ.) यांची लिंक देण्यात आलेली आहे. त्यावर क्लिक करून नागरिकांनी फॉलो केल्यास त्यांना दैनंदिन अपडेट्स प्राप्त होतील.
शासन स्तरावरील विविध योजना यामध्ये नागरिकांना शासन स्तरावर राबवल्या जात असलेल्या विविध योजनाबद्दल माहिती मिळण्यासाठी शासनाच्या विविध संकेत स्थळांची लिंक देण्यात आलेली आहे. महापालिका रुग्णालय व आरोग्य केंद्र यामध्ये अहिल्यानगर महानगपालिकेतील दवाखाने व आरोग्य सेवा केंद्र तसेच खाजगी रुग्णालय याबाबतची माहिती नागरिकांना मिळण्यास मदत होणार आहे. तसेच आरोग्य सेवा केंद्र व दवाखाने यांचे गुगल मॅपद्वारे नागरिकांना लोकेशन मिळणार आहे, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.





