महाराष्ट्रातील रेल्वे कोविड कोच रिकामेच; एकही रुग्ण झाला नाही दाखल,आरटीआय’च्या चौकशीतून माहिती उघड
राज्यात करोनाचा संसर्ग अद्यापही वाढत असताना, एक आश्चर्यकारक माहिती आरटीआयच्या चौकशीद्वारे समोर आली आहे. राज्यातील करोना रुग्णांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या, कोविडि केअर कोचमध्ये आतापर्यंत महाराष्ट्रात एकही रुग्ण दाखल झालेला नाही.
‘आरटीआय’च्या चौकशीत असे समोर आले आहे की, राज्यात कोट्यावधी रुपये खर्च करून ९०० नॉन-एसी स्लीपर कोचचे रुपांतर आयसोलेशन युनिटमध्ये करण्यात आले, मात्र या कोचमध्ये कोणत्याही कोविड पेशंटला दाखल केले गेले नाही. विशेष म्हणेज, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेकडून या कोचचे रुपांतर आयसोलेशन युनिटमध्ये करण्यासाठी जवळपास ६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
मार्च मध्ये रेल्वे बोर्डाने निर्देश दिल्यानंतर मध्य रेल्वेने ३.८ कोटी रुपये खर्च करून ४८२ कोविड केअर कोचेसची निर्मिती केली. तर, पश्चिम रेल्वेकडून महाराष्ट्रातील करोना रुग्ण संख्या वाढल्यास उपाययोजना म्हणून ४१० कोचेसची २ कोटी रुपये खर्चून निर्मिती केली गेली.
ठाण्यातील रहिवासी रविंद्र भागवत यांनी आरटीआयच्या माध्यमातून या संदर्भात मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेकडे माहिती मागितली होती. त्यांनतर ही बाब उजेडात आली. साधारणपणे कोचचे रुपांतर आयसोलेशन सुविधा देणाऱ्या युनिटमध्ये करण्यासाठी ८५ हजार रुपये खर्च आल्याचे समोर आले. याशिवाय, सेवा सुरळीत झाल्यानंतर हे कोच पुन्हा पुर्ववत करण्यासाठी वेगळा खर्च देखील असणार आहे.
रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, पैसा वाया गेला असं म्हणनं योग्य राहणार नाही. कारण, सरकारला जर आणखी गरज भासली असती, तर ही एक आपत्कालीन सुविधा होती. भारतीय रेल्वेकडून देशभरात ८० हजार बेड्सच्या क्षमतेसह असे ५ हजार कोविड केअर कोचेस उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या कोचचा वापर दिल्ली, उत्तर प्रदेश व बिहार या केवळ तीन राज्यांमध्येच झाला. आतापर्यंत या तीन राज्यातील जवळपास ९९३ रुग्ण या कोविड केअर कोचमध्ये दाखल झाले होते. त्या सर्व जणांना उपचारानंतर डिस्चार्ज मिळालेला आहे.