
श्रीरामपूर – श्रीरामपूर शहरातील न्यायालयामध्ये आज दिनांक 30 जुलै 2025 रोजी सायंकाळच्या सत्रामध्ये एका वकिलाला आरोपीकडून न्यायाधीशासमोर मारहाण झाली. यामध्ये आरोपीने वकिलाला धरून समोर असलेल्या डायसवर (टेबल) वकिलाचे डोके सिनेस्टाईल आदळले.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर न्यायालयामध्ये एका घटस्फोटाच्या खटल्याची सुनावणी चालू होती. त्यामध्ये एक वकील आरोपी अभिजीत संजयराव पाथरकर, राहणार- अमरावती याची उलट तपासणी (क्रॉस) घेत होते. त्यावेळी वकीलाने विचारलेल्या प्रश्नांमुळे चिडून जात आरोपीने वकिलाला मारहाण करत वकिलाचे डोके जजसमोर असलेल्या डायसवर आदळले. या घटनेमुळे श्रीरामपूर न्यायालयात गर्दी जमली व सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तात्काळ या ठिकाणी पथकासह धाव घेतली आहे. या आरोपीला न्यायालयातल्या वरच्या एका खोलीत ठेवण्यात आल्याची माहिती समजते. अशा घटना चित्रपटात पहायला मिळतात पण श्रीरामपुरात हे वास्तवात झाले आहे.