
गणपतीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असताना गणपतीच्या सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिक फुलांवर बंदी घालण्यात येणार आहे. विधानसभेत 105 आमदारांच्या सहीसह पत्रक सादर करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचीही याला संमती असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे यंदाच्या गणपती उत्सवाला आरास करताना नैसर्गिक फुलांचा वापर करावा लागणार आहे. विविध सण उत्सवांच्या वेळी बऱ्याच वेळा प्लॅस्टिक फुलांचा वापर केला जातो.
सणा-सुदीला, विविध उत्सवात सजावटीसाठी बाजारात येणाऱ्या प्लॅस्टिक फुलांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे, कृत्रिम फुले बंद व्हावीत व फुल उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक लावून तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तासगाव कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांनी निवेदनाद्वारे केली होती. या मागणीला 105 आमदारांच्या सहीसह पाठिंबा पत्र जोडत फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा विषय महत्त्वाचा असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.याबाबत मुख्यमंत्र्यांनी लवकरच फलोत्पादन मंत्री भरत गोगावले व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले आहे. विशेष म्हणजे मंत्री गोगवले यांनी देखील शासन कृत्रिम फुलांवर बंदी आणेल, असे म्हटले आहे.
प्लॅस्टिक पिशवी वापरावर ज्याप्रमाणे शासनाने बंदी आणली त्याप्रमाणे या प्लॅस्टिकच्या फुलांवर कायमस्वरूपी निर्बंध घातल्यास त्याचा शेतकरी वर्गास मोठा फायदा होणार आहे. या फुलशेतीसाठीचा खर्च पाहता शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे प्लॅस्टिक फुलांवर कायमस्वरूपी निर्बंध आणून फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देणेसाठी बैठक आयोजित करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.