
शुभांशू शुक्ला आज पृथ्वीवर परतणार, भारताच्या अंतराळ इतिहासात सुवर्णक्षण, जाणून घ्या.
भारताच्या अंतराळ क्षेत्रात आणखी एक अभिमानास्पद पान जोडले जाणार असून भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची Ax-4 मोहीम आता अंतिम टप्प्यात आली आहे. ते आज स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक ISS पासून वेगळे होऊन पुन्हा पृथ्वीवर परतणार आहेत. भारतीय वेळेनुसार दुपारी 4.35 वाजता हे वेगळी होणे अपेक्षित आहे.
या ऐतिहासिक क्षणाकडे संपूर्ण जग विशेष म्हणजे भारताचे लक्ष लागून राहिले आहे. कारण भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे भारताचे दुसरे अंतराळवीर ठरले. विशेष म्हणजे त्यांनी Ax-4 मोहिमेत पायलटची भूमिका पार पाडली. ही मोहीम भारतासाठी खास आहे कारण ती ISRO च्या गगनयान मोहिमेच्या तयारीचा एक महत्त्वपूर्ण भाग मानली जाते.
25 जून 2025 रोजी स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून शुभांशू शुक्ला आणि त्यांचे सहकारी अंतराळात गेले. या टीममध्ये अमेरिकेच्या पेगी व्हिटसन, पोलंडच्या स्लाव्होस उजनांस्की-विश्निव्स्की आणि हंगेरीच्या टिबोर कापू यांचा समावेश होता. ही मोहीम केवळ वैज्ञानिक संशोधनापुरती मर्यादित नव्हती तर भारत, पोलंड आणि हंगेरी या देशांसाठी सरकारी सहभाग असलेली पहिली खाजगी अंतराळ मोहीम ठरली आहे.
शुभांशू शुक्ला यांनी सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात मानवी आरोग्य आणि वनस्पतींची वाढ यावर महत्त्वपूर्ण प्रयोग केले. त्यांचे कार्य तरुण वैज्ञानिकांसाठी आणि नव्या पिढीसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरणार आहे. 14 जुलै रोजी ड्रॅगन कॅप्सूल ISS पासून वेगळे होईल आणि काही तासांत पृथ्वीच्या दिशेने प्रवास करेल. यानाचे लँडिंग समुद्रात होणार असून तिथे तैनात असलेल्या बचाव जहाजांद्वारे अंतराळवीरांना सुरक्षितरित्या बाहेर काढले जाईल. हवामान आणि तांत्रिक अटींच्या आधारे वेळेत काहीसा बदल होऊ शकतो.




