रील्स काढण्याच्या बहाण्याने मित्राची ३१ लाख ७० हजारांची रोकड घेवून एक जण पसार

    105

    अहिल्यानगर (प्रतिनिधी) – मित्रासाठी जीवाला जीव देणारे, त्याच्या सुखादुःखात सहभागी होणारे, अडचणीतून बाहेर काढण्यास मदत करणारे मित्र या दुनियेत अनेक ठिकाणी पाहायला मिळतात, पण दोस्तीत कुस्ती करणारे, मित्राशी दगाबाजी करणारे, त्याचा विश्वासघात करणारे महाभागही कमी नाहीत. याचा प्रत्यय २ दिवसांपूर्वी नगरमध्ये एकाला आला आहे.पैशांसोबत रील्स काढण्याच्या बहाण्याने एकाने त्याच्या मित्राची तब्बल ३१ लाख ७० हजारांची रोकड घेवून पोबारा केल्याची घटना २४ एप्रिल रोजी नगर मध्ये घडली आहे.

    याबाबत श्रेयश पांडुरंग लटपटे (वय २३, रा. भायगाव, ता. शेवगाव) या तरुणाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी श्रेयश हा आनंद मशिनरी अॅण्ड इलेक्ट्रिकल्स या फर्म मध्ये मॅनेजमेंटचे काम पाहतात. या फर्मकडे पाईप डिस्ट्रीब्युशनची डिलरशीप आहे. त्यांच्या फर्मच्या अहिल्यानगर, अकोला व इतर ठिकाणी बँच आहेत. या सर्व ठिकाणीच्या रकमेचे कलेक्शन करण्याचे काम फिर्यादी श्रेयश हे करतात. २४ एप्रिल रोजी त्यांनी कारंजा मालेगाव, मेहकर येथील दुकानदारांकडून रोख रकमेचे कलेक्शन केले व ३१ लाख ७० हजारांची रोकड घेवून ते नगरला येत होते. त्यावेळी त्यांना त्यांचा मित्र सुजित राजेंद्र चौधर (रा. निपाणी जळगाव, ता. पाथर्डी) याचा फोन आला. फोन वर तो म्हणाला की तुझ्याकडे रोकड आहे का? मला रोकड सोबत रील्स काढायचा आहे. त्यावेळी फोन करणारा हा ओळखीचा मित्र असल्याने श्रेयश याने रोकड असल्याचे सांगितले.

    त्यामुळे सकाळी ९ च्या सुमारास दोघे एमआयडीसी येथील सनफार्मा चौकात भेटले. तेथून ते सुजित चौधर याच्या मारुती सियाझ कार (क्र. एमएच १६ बीएच ४७९९) मध्ये बसून शेंडी बायपास रोडवर गेले. तेथे गेल्यावर आरोपी चौधर हा फिर्यादी श्रेयश ला म्हणाला की, तू समोर उभ्या असलेल्या गाडीतून कॅमेरा घेवून ये. त्यावेळी श्रेयश याने त्याच्या जवळील रोकड असलेली बॅग मारुती सियाझ कारच्या सीट वर ठेवून तो कॅमेरा आणण्यासाठी गेला.त्याच वेळी आरोपी चौधर याने कार सुरु करून तो भरधाव वेगात ३१ लाख ७० हजारांची रोकड असलेली बॅग घेवून पसार झाला. श्रेयश याने त्याला वारंवार फोन केला मात्र त्याने फोन उचलला नाही. आपली फसवणूक झाल्याचे श्रेयश याच्या लक्षात आल्यावर त्याने २५ एप्रिलला सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी सुजित चौधर याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here