मंत्रिमंडळ बैठकीतील 8 मोठे निर्णय 142 कोटींचं सावित्रीबाईंचं स्मारक ते कामगार संहिता

    117

    राज्य सरकारची आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे आजच्या मंत्रिमडंळ बैठकीच्या माध्यमातून सरकारने सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांचे स्मारक निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मारकासाठी तब्बल 142 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

    तसेच राज्य सरकारने कामगार कायद्यांतही मोठे बदल करण्याचं ठरवलं आहे. याबाबतही सरकारने कामगारांसाठी महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यात येतील, असं ठरवलं आहे. झोपडपट्टी पुनर्वसनाच्या योजनेतील घरांची निर्मिती आणि वितरण पद्धतीतही सुधारणा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

    मंत्रिमंडळ बैठकीतील 8 मोठे निर्णय पुढीलप्रमाणे :

    ग्रामविकास विभाग मौजे नायगाव ता. खंडाळा जि. सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय. स्मारकासाठी 142.60 कोटी तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी 67.17 लाख रुपयांच्या तरतूदीस मंजुरी.

    जलसंपदा विभाग – गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, ता. पवनी, जि. भंडारा या प्रकल्पाच्या 25 हजार 972 कोटी 69 लाख रुपयांच्या तरतूदीस सुधारित प्रशासकीय मान्यता.

    कामगार विभाग – राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करणार

    महसूल विभाग – विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्त कंत्राटी विधी अधिकारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय, 35 हजार रुपयां ऐवजी 50 हजार रुपये मानधन मिळणार.

    विधी व न्याय विभाग – 14 व्या वित्त आयोगामार्फत राज्यात तात्पुरत्या स्वरुपात स्थापन करण्यात आलेल्या 16 अतिरिक्त न्यायालयांना व 23 जलदगती न्यायालयांना आणखी 2 वर्षे मुदतवाढ देण्यास व त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता.

    मत्स्यव्यवसाय विभाग मत्स्यव्यवसायास चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रा सारखाच दर्जा देण्याचा निर्णय. मच्छिमारी, मत्स्य व्यावसायसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, सवलतीचा लाभ होणार.

    गृहनिर्माण विभाग – पायाभूत सुविधांच्या अमंलबजावणीत बाधित झोपडपट्टी पुनर्वसनाच्या योजनेतील घरांची निर्मिती व त्यांच्या वितरणासाठीच्या धोरणात सुधारणा

    सार्वजनिक बांधकाम विभाग – पुणे जिल्ह्यातील तळेगाव-चाकण-शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव ते चाकण यावर चार पदरी उन्नत मार्ग व जमिनीस समांतर चार पदरी रस्ता तसेच चाकण ते शिक्रापूर यावर जमिनीस समांतर सहा पदरी रस्ता तयार करण्याचा निर्णय.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here