Rahul Gandhi : राहुल गांधींना दिलासा; ‘त्या’ प्रकरणात जामीन मंजूर

    102

    नगर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर येथील जिल्हा न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. २०१८ साली राहुल गांधींविरोधात याबाबत तक्रार करण्यात आली होती.

    जामिनासाठी दाखल केला होता अर्ज (Rahul Gandhi)

    न्यायालयाच्या या निर्णयाबाबत वकील तारकेश्वर सिंह यांनी अधिक माहिती दिली. “राहुल गांधी यांना मानहानीच्या या खटल्यात समन्स जारी करण्यात आले होते. त्यानंतर राहुल गांधी कोर्टात हजर झाले होते. याआधी जामीन मिळावा, यासाठी राहुल गांधी यांच्याकडून न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे,” असे तारकेश्वर यांनी सांगितले. राहुल गांधी यांना २५ हजार रुपयांच्या जामिनावर आणि २५हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कोर्टाने जामीन मंजूर केला आहे

    राहुल गांधी यांच्यावर आरोप काय ? (Rahul Gandhi)

    भाजपाचे नेते विजय मिश्रा यांनी ४ ऑगस्ट २०१८ रोजी राहुल गांधींविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २००५ सालच्या बनावट एन्काऊंटर प्रकरणात अमित शाहांना दोषमुक्त केले होते. या प्रकरणा दरम्यान अमित शाह हे गुजरातचे गृहमंत्री होते. त्यानंतर चार वर्षांनी राहुल गांधी बंगळुरू येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी अमित शाहांवर एक विधान केले होते. हेच विधान मानहानीकारक असल्याचा दावा मिश्रा यांनी केला होता. त्यानंतर राहुल गांधींविरोधात मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली होती. या खटल्यासंदर्भात आता राहुल गांधी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here