Atrocity : जातीयवाचक शिवीगाळ करणाऱ्या आई व मुलांना दोन वर्षे कारावास

    203

    Atrocity : नगर : जातीयवाचक शिवीगाळ (Atrocity) केल्याच्या आरोपात आई व तिच्या दोन मुलांना जिल्हा व सत्र न्यायालयाने (District and Sessions Court) दोषी धरत दोन वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. उषाबाई मच्छिंद्र जाधव (वय ५७), कैलास मच्छिंद्र जाधव (वय ३८) व विजय मच्छिंद्र जाधव (वय ३१, सर्व रा. निमगाव वाघा, ता. नगर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील (Public Prosecutor) मोहन कुलकर्णी यांनी काम पाहिले.

    निमगाव वाघा येथील घटना (Atrocity)

    निमगाव वाघा येथे एका कुटुंबाकडे उषाबाई जाधवने दळणाचे पैसे मागितले. मात्र, त्या कुटुंबाने जाधव यांच्या शेतात काम केलेल्या मजुरीचे पैसे वळते करण्यास सांगितले. उषाबाई जाधवने तिची मुले कैलास व विजय यांना बोलावून घेतले. यावेळी झालेल्या वादातून उषाबाई, कैलास व विजय यांनी संबंधित कुटुंबाला मारहाण केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले.

    युक्तिवाद व पुरावे ग्राह्य धरून शिक्षा (Atrocity)

    न्यायालयाने सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासले. यात फिर्यादी, जखमी फिर्यादीचे वडील, पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार आदींच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. युक्तिवाद, पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी धरले. तीनही आरोपींना दुखापत केल्याच्या गुन्ह्यात दोन वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंड, इच्छापूर्वक दुखापत करण्याच्या गुन्ह्यात एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंड, शांतता भंग करण्याच्या गुन्ह्यात एक वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंड, अॅट्रासीटी कायद्यानुसार एक वर्ष सक्त मजुरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंड असा एकूण दोन वर्षे सक्त मजुरी व १२ हजार रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली आहे. ही शिक्षा आरोपींना एकत्रित भोगावी लागणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here