
Anganwadi worker : अकोले : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या (Anganwadi worker) विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.16) अकोले तालुक्यातील राजूर प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी राजूर शहरात शक्ती प्रदर्शन (display of power) करीत मोर्चा काढला. संपाच्या 44 व्या दिवशी सीटू प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये (march) आदिवासी भागातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
हजर न झाल्यास आपणास कार्यमुक्त (Anganwadi worker)
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याबाबतच्या नोटिसा बजावल्या आहेत. कामावर हजर न झाल्यास आपणास कार्यमुक्त करण्यात येईल, असेही नोटिसीमध्ये बजावण्यात आले आहे. नोटिसीला कायदेशीर उत्तर देण्याची मोहीम सध्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने सुरू आहे. प्राप्त झालेल्या नोटिसा कार्यालयाच्या समोर जाऊन फाडून हवेत भिरकावून देण्यात आल्या व बजावण्यात आलेल्या नोटिसींना कायदेशीर उत्तर तयार करून राजूर विभागाच्या सी. डी. पी. ओ. कार्यालयात जमा करण्यात आले.
किमान 26 हजार वेतनाची मागणी (Anganwadi worker)
मानधन नको वेतन हवे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कायम सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा मिळाला पाहिजे, अंगणवाडी सेविकांना किमान 26 हजार रुपये मानधन सुरू झाले पाहिजे, सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा अंगणवाडी सेविकांना दिल्या पाहिजेत. यांसारख्या प्रमुख मागण्या घेऊन काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश ताजणे, अध्यक्षा रंजना पऱ्हाड, सचिव आशा घोलप, राजूर विभागाच्या प्रमुख निर्मला मांगे, नंदा म्हसे, मथुरा चौधरी, कविता औटी, पद्मा पाटोळे, वंदना कराळे, लीला गायकर, द्रौपदा रावते, इंदुमती चोखंडे, मुक्ता शिंदे, छाया मोरे, माधुरी झोडगे, माधुरी वाकचौरे आदींनी केले. मोर्चाला किसान सभेचे डॉ. अजित नवले, नामदेव भांगरे, शिवराम लहामटे, बहिरू रेंगडे, कॉ. घोडे, डी.वाय.एफ.आय.चे एकनाथ मेंगाळ, सीटूच्या संगीता साळवे, श्रमिक मुक्ती दलाचे स्वप्नील धांडे, बिरसा ब्रिगेडचे दशरथ गभाले यांनी पाठिंबा दिला. राजूर विभागाच्या सी. डी. पी. ओ. सातळकर यांनी निवेदन स्वीकारले. मोर्चासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.




