Milk : ”दूध उत्पादकांच्या उर्वरित प्रश्नांवर कार्यवाही करा”

    138

    Milk : अकोले : दूध (Milk) उत्पादकांना कोसळलेल्या दूध दराबाबत (milk rate) दिलासा देण्यासाठी सरकारने दूध उत्पादकांना प्रतीलिटर ५ रुपयाचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे. दूध उत्पादक (Milk producer) शेतकर्‍यांना यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळेल. मात्र याबरोबरच दुधाचा वाढता उत्पादन खर्च कमी करण्याची, दुधातील भेसळ रोखण्याची, सदोष वजनकाटे व मिल्कोमीटर वापरून होत असलेली दूध उत्पादकांची लूट थांबविण्याची नितांत गरज आहे. दूध अनुदानाचा प्रश्न काही प्रमाणात पुढे गेला असल्याने आता दुग्धविकास विभाग व सरकारने या उर्वरित प्रश्नांबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेने केली आहे.

    पशुखाद्य, औषधे, चारा व पूरक आहाराचे दर सातत्याने वाढत आहेत. दुधाचा उत्पादन खर्च यामुळे मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. प्रादेशिक दुग्धविकास अधिकार्‍यांनी सतीश देशमुख यांच्या माहितीच्या अधिकाराखालील प्रश्नाला उत्तर देताना जाहीर केल्याप्रमाणे दुधाचा प्रतीलिटर सरासरी उत्पादन खर्च ४२.३३ रुपये आहे. दुधाला सरकारने अनुदानासह केवळ ३२ रुपये दर जाहीर केला आहे. प्रादेशिक दुग्धविकास कार्यालयांनी जाहीर केलेल्या दूध उत्पादन खर्चाशी तुलना करता दूध उत्पादक शेतकर्‍यांना अनुदान जमेस धरून अद्यापही १० रुपयाचा तोटा सहन करावा लागतो आहे. असेच सुरू राहिले तर शेतकर्‍यांना दूध व्यवसायातून बाहेर पडण्याशिवाय कोणताच मार्ग शिल्लक राहणार नाही.

    सन २०१८-१९ मध्ये झालेल्या वीसाव्या पशुगणनेनुसार राज्यात १३९.९२ लाख गाई, ५६.०४ लाख म्हशी आहेत. राज्याच्या एकूण उत्पन्नात पशुधनाचा मोठा वाटा आहे. राज्याला यातून मोठ्या प्रमाणात कर मिळतो. राज्य सरकारने पशुधन व दुग्ध व्यवसायातून मिळणार्‍या या कराचा काही भाग जरी पशुपालकांवर खर्च केला तरी दुग्ध व्यवसायाची परिस्थिती नक्की बदलता येईल. त्यामुळे पशुखाद्याचे भाव कमी आणि मिल्कोमीटर व वजन काटे तपासण्याची स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणी किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, सतीश देशमुख, जोतीराम जाधव, नंदू रोकडे, सदाशिव साबळे, दादा गाढवे, दीपक वाळे, राजकुमार झोरी, श्रीकांत करे, डॉ. अशोक ढगे, अमोल गोर्डे, धनंजय धोरडे, रामनाथ वदक, सुदेश जाधव, सुदेश इंगळे, रवी हासे, दीपक अण्णा काटे, सागर जाधव, अप्पा अनारसे, अरविंद कापसे, दादा कुंजीर, दीपक पानसरे, इंद्रजीत जाधव, केशव जजांळे आदींनी केली आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here