
Atmanirbhar Bharat Abhiyaan : नगर : नव्या भारताची (India) नवीन खादीने ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’ला (Atmanirbhar Bharat Abhiyaan) नवी दिशा दिली आहे. गेल्या नऊ वर्षांत खादी उत्पादनांच्या विक्रीत चार पटीने वाढ झाली असून ग्रामीण भागातील कारागीर आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाले आहे, अशी माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे अध्यक्ष मनोज कुमार (Manoj Kumar) यांनी दिली.
पंढरपूर येथे खादी व ग्रामोद्योग आयोग आणि नामदार रामदास आठवले युवामंच संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ग्रामोद्योग विकास योजनेंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या १८० लाभार्थ्यांना मधुमक्षिकापालन पेटी, स्वयंचलित अगरबत्ती बनविण्याची मशिन तसेच विद्युतचलित चाकाचे वाटप अध्यक्ष मनोज कुमार यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी खादी-ग्रामोद्योग आयोगाचे केंद्रीय संचालक विजय श्रीधरण, राज्य निदेशक योगेश भांबरे आदी उपस्थित हाेते. कुमार म्हणाले, ”‘वोकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ मंत्रामुळे खादीला जागतिक व्यासपीठावर ओळख मिळाली आहे. गेल्या नऊ वर्षांत खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या उलाढालीने एक कोटी ३४ लाख रुपयांचा आकडा ओलांडला आहे.