Government Hospital : ”श्रीगोंदा व संगमनेरमधील सरकारी रुग्णालयांचे बांधकाम पूर्ण करा”

    107

    Government Hospital : संगमनेर : एकीकडे राज्यातील सरकारी रुग्णालयांची (Government Hospital) अवस्था बिकट असताना दुसऱ्या बाजूला श्रीगोंदा आणि संगमनेर येथे सरकारी रुग्णालयांची वानवा आहे. या दोन्ही रुग्णालयांना मान्यता मिळूनही ही रुग्णालये अद्याप कागदावरच आहेत. या रुग्णालयांचे बांधकाम तातडीने पूर्ण करून श्रीगोंदा व संगमनेर तालुक्यांमधील लाखो रुग्णांना दिलासा द्या, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (Legislative Winter Session) केली.

    फेब्रुवारी २०२२ च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व संगमनेर येथील ५० ते १०० खाटांच्या शासकीय रुग्णालयांचे बांधकाम अजूनही प्रलंबित आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे दोन्ही ठिकाणी रुग्णांसाठी रुग्णालयांची आवश्यकता असून ग्रामस्थांना ६० ते ८० किलोमीटर जावे लागत आहे. इतकी वणवण करून देखील रुग्णालय जवळपास उपलब्ध नसल्याने रुग्णांचे रस्त्यातच जीव जातात. या दोन्ही रुग्णालयांच्या बांधकामांना सरकारने गेल्या वर्षीच मान्यता दिली असून त्याचे काम अजून पर्यंत पूर्ण का झाले नाही? असा प्रश्न आमदार तांबे यांनी आरोग्यमंत्र्यांना केला.

    आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत उत्तर देताना म्हणाले की, श्रीगोंदा व संगमनेर येथे सद्यस्थितीत ३० खाटांचे रुग्णालय कार्यान्वयीत आहे. श्रीगोंदा येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय बांधकामास शासन निर्णय फेब्रुवारी २०२२ प्रमाणे १ हजार ६० लक्ष रुपयांच्या बांधकामास मान्यता देण्यात आली आहे. तसेच घुलेवाडी (संगमनेर) येथे १०० खाटांच्या २ हजार ९७० लक्ष रूपयांच्या रुग्णालय बांधकामास मार्च २०२२ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर बांधकामाची निविदेबाबतची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यास्तरावर सुरू आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here