
नेवासा : तालुक्यातील आदर्श गाव वडूले (Vadule) येथील सरपंच दिनकरराव गर्जे यांच्या वकील असलेल्या मुलावर जमिनीच्या वादातून प्राणघातक हल्ला (Deadly Attack) केल्याची घटना ३० नोव्हेंबर रोजी दुपारी घडली होती. याबाबत ९ जणांवर जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह विविध कलमानुसार नेवासा पोलीस ठाण्यात (Nevasa Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नेवासा वकील संघाने दिला आहे.
नेवासा वकील संघाच्या वतीने पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेवासा वकील संघाचे सदस्य ॲड. प्रसाद दिनकरराव गर्जे व त्यांच्या कुटुंबीयांवर घरी जाऊन व घरात घुसून आरोपींनी प्राणघातक हल्ला केला आहे. या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मात्र अजूनपर्यंत कुठल्याही आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नाही.
गुन्ह्यातील आरोपी हे गर्जे कुटुंबीयांना धमक्या देत असून त्यांना तात्काळ अटक करावी, अन्यथा कुठलीही पूर्वसूचना न देता रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. कैलास कापसे, ॲड.गोकुळ भताने, ॲड.अजय रिंधे,ॲड.गणेश निकम,ॲड.गणेश खिळदकर,ॲड.साईनाथ हुळहळे, ॲड.नंदकुमार जोशी,ॲड.माधव काळे,ॲड.जावेद इनामदार ॲड. आर.टी.पाठे.ॲड.सुभाष सकट,ॲड.इर्शाद सय्यद,ॲड. सुदाम ठबे,ॲड.भारत चव्हाण यांनी दिला आहे.