
BJP : नगर : ”मी कडक शिस्त लावण्यासाठी राज्य सहकारी बँक (State Cooperative Bank) संचालक मंडळ बरखास्त केलं. हे मंडळ बरखास्त झाल्याने राष्ट्रवादीत (NCP) आणि माझ्यात वितुष्ट आले. हा निर्णय घेतला नसता तर भाजपची (BJP) महाराष्ट्रामध्ये सत्ता आलीच नसती. ती एक राजकीय चूक होती, अशी कबुली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
काॅम्पिटिटर्स फाउंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या खा. स्व. राजीव सातव पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. साखर संचालक डॉ. संजय कुमार भोसले याना हा पुरस्कार देण्यात आला.
राजकारण आणि प्रशासनावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यामधील राजकारणातील सर्वात मोठ्या राजकीय निर्णयाचा विषयी कबुली दिली.
सहकार क्षेत्राबद्दल मला फारसं माहिती नव्हतं. मी अनेक गोष्टी समजून घेतल्या. सहकार क्षेत्रामध्ये शिस्त आणायचा प्रयत्न केला. त्यावेळी राज्य सहकारी बँकचे संचालक मंडळ बरखास्त केले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाराज झाले. त्यांनतर आमच्यात वाद झाले. त्याचे परिणाम सरकारवर झाला. हे मंडळ बरखास्त केलं नसतं, तर २०१४ आणि २०१९ ला देखील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच सत्ता राहिली असती. भाजप सत्तेत आली नसती, असाही त्यांनी स्पष्ट कबुली दिली. भाजप सरकारकडून सुरू असलेल्या खासगीकरणाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. किमान सरकारी नोकरीचे खासगीकरण होऊ नये, अशी अपेक्षा त्यानी यावेळी व्यक्त केली.