
नगर : जलयुक्त शिवार अभियान (Jalyukt Shivar Abhiyan) टप्पा दोन जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या गावांना जलपरिपूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी (Collector) सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलयुक्त शिवार अभियान-२ बाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी मनोज ढोकचवळे आदी उपस्थित हाेते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, ”जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन मध्ये जिल्ह्यातील ३६८ गावांची निवड करण्यात आली आहे. यात नगर तालुक्यातील १४, नेवासे १२, श्रीगोंदे १४, पारनेर १७, कर्जत ३९, जामखेड २२, शेवगाव १७, पाथर्डी १८, श्रीरामपूर १२, राहुरी १९, कोपरगाव २३, राहता २४, संगमनेर ९२, तर अकोले तालुक्यातील ४५ गावांचा समावेश आहे.
या गावांमध्ये योजनेंतर्गतची कामे अत्यंत दर्जेदारपणे करण्यात यावीत. शासनाच्या निर्देशानुसार गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेमध्ये गाळ वाहून नेणाऱ्या शेतकऱ्यास एकरी १५ हजार रुपये अनुदान तसेच ग्रामपंचायत किंवा स्वयंसेवी संस्था यांना प्रतिघनमीटर गाळ काढण्यासाठी ३१ रुपये इंधन खर्चासाठी अनुदान देण्यात येत आहे. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेची कामे हाती घेण्यात येऊन ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.