Theft : डॉक्टरला बांधून ठेवत 40 लाखांची चोरी

    112

    श्रीरामपूर : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हॉस्पिटल असलेल्या नामांकित हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टरांना खिडकीला बांधून ठेवत चोरट्यांनी कपाटातून ४० लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. सोमवारी (ता.३०) पहाटे ४ ते ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील काळाराम मंदिराजवळ डॉ. प्रफुल्ल ब्रम्हे यांचे मंगेश हॉस्पिटल आहे. याठिकाणी ते रुग्णांची तपासणी करतात. हाॅस्पिटलच्या वरतीच त्यांचे घर असून ते पत्नी अपर्णा, मुलगा डॉ. चिन्मय व मुलगी शांभवी यांच्या समवेत राहतात. पत्नी अपर्णा व मुलगी शांभवी या २३ ऑक्टोबरला करवार (कर्नाटक) येथे माहेरी गेल्या होत्या. मुलगा नेत्ररोग तज्ज्ञ असून तो २६ ऑक्टोबरला कोल्हापूर येथे वैद्यकीय कॉन्फरन्ससाठी गेला होता. तेव्हापासून डॉक्टर हे घरी एकटेच होते.

    सोमवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास मुलगा चिन्मय हा घरी परतला. त्यानंतर तो स्वतंत्र खोलीत झोपी गेला. पहाटे चार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी हॉस्पिटल शेजारी असलेल्या भेळवाल्याची घराबाहेरील शिडी आणून हॉस्पिटलच्या पुढील बाजूने गच्चीवर प्रवेश केला. त्यानंतर गच्चीवरील जाळीचे गज कापून दोरीच्या साह्याने घरात प्रवेश केला. डाॅक्टरांच्या खोलीचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला, तर मुलाच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली. डॉक्टरांना जाग आली असता त्यांच्यासमोर तोंडाला रुमाल बांधलेली एक व्यक्ती उभी होती. त्याने डॉक्टरांच्या तोंडावर हात ठेवून गप्प राहण्यास सांगितले. दरम्यान आणखीन दोघांनी आत प्रवेश करून एकाने त्यांचे हात पकडले. त्यांनी बेडशीटच्या सहाय्याने डाॅक्टरांचे हातपाय बांधून खिडकीला बांधले. त्यानंतर घरातील कपाटाच्या चाव्या मागितल्या असता पत्नी बाहेरगावी गेली असून चाव्या तिच्याकडे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नंतर दोघे कपाट ठेवलेल्या खोलीत गेले. पाच ते दहा मिनिटात ते त्या खोलीतून परतले.

    चोरटे गेल्यानंतर त्यांनी प्रथम आपली सुटका केली व डॉ.रवींद्र जगधने व शांतीलाल पोरवाल यांना संपर्क साधला. तसेच मुलालाही उठवून झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर कपाटाची खोली पाहिली असता उचकापाचक केलेली दिसली. तसेच कपाटातील ४० लाखांची रोकड गायब असल्याचे आढळून आले. याप्रकरणी डॉ.ब्रम्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करीत आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here