Manoj Jarange : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अजिबात वळवळ करू नका : मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

    155

    नगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी सरकारला (Govt) ४० दिवसांची मुदत दिली. आता यापुढे एक तासही देणार नाही. मी समाजाला शब्द दिला आहे. आरक्षण मिळेपर्यंत एकही इंचही मागे हटणार नाही. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अजिबात वळवळ करू नका, असा इशारा संघर्ष याेद्धा मनाेज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी सरकारला दिला आहे. 

    मनोज जरांगे पाटील यांची नुकतीच नगरमधील कर्जतमध्ये भव्य सभा पार पडली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. जरांगे पाटील म्हणाले, ”मराठा आरक्षणासाठी सरकारने समिती नेमली. त्यांना पाच हजार पानांचा पुरावे सापडले आहे. आरक्षण मिळण्यासाठी आधार लागताे. आता आधारही मिळाला आहे. सरकारने राज्यपालांची परवानगी घेऊन तत्काळ अधिवेशन घेऊन आरक्षण मंजूर करावे. मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही.  

    आरक्षण देण्यासाठी सरकारने आपल्याकडे ३० दिवस मागितले. आम्ही त्यांना ४० दिवस दिले. त्यांना आश्चर्य वाटलं. एवढे दिवस दिलेच कसे? आपण त्यांना मुद्दाम ४० दिवस दिले. कारण त्यांना बहाणा हवा होता. त्यांनी आरक्षण दिलं असतं आणि ते टिकलं नसतं तर तुम्ही वेळ दिला नाही. त्यामुळेच आरक्षण टिकलं नाही असं सांगून आरक्षण न देण्याचा सरकारचा डाव होता. पण आपण त्यांना ३० ऐवजी ४० दिवस दिले आणि त्यांचा डाव उधळून लावला, असं सांगतानाच आता सरकारने वळवळ करू नये. अजून एक दोन दिवस तर काय एक घंटाही मिळणार नाही. आरक्षण द्यावंच लागेल. मी आरक्षण मिळवण्यासाठी कामाला लागलोय. शब्द देतो शांततेच्या आंदोलनानं आरक्षण घेऊ. निर्णयाच्या प्रक्रियेपर्यंत आलो आहोत.  

    यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना कार्यक्रमही दिला. गाफिल राहू नका, सरकारची जशी कसोटी तशी आपलीही आहे. एकही गाव सोडू नका. घराघरात जा. मराठ्यांना आरक्षण कशासाठी पाहिजे हे समजून सांगा. एकत्रित का यायचं हे सांगा. उग्र आंदोलन करू नका. जाळपोळ करू नका. आपल्या पोरांवर केसेस होतात. शिक्षण आणि नोकरीत अडचणी होतील. आता सरकारची सुटका नाही. त्यांनी अनेक डाव टाकले पण आपण उधळून लावलेत. सगळे पक्ष, गट तट बाजूला ठेवा आणि मराठा समाजाला आरक्षणाचं दान टाकून द्या, असंही जरांगे पाटील म्हणाले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here