
नगर : जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) परीक्षेचे वेळापत्रक रद्द झाल्याने इच्छुक उमेदवारांचा पुरता गोंधळ उडाला आहे. नियोजित परीक्षा (Exam) तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. पुढील वेळापत्रक (Schedule) प्राप्त होताच कळवले जाईल, असा खुलासा जिल्हा परिषद संकेतस्थळावरून करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या पदभरतीसाठी ७ ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू झाली. नगर जिल्हा परिषदेच्या १९ संवर्गातील ९३७ पदांचा यात समावेश आहे. पहिल्या टप्प्यात ७ ते ११ अशा चार दिवसांचे वेळापत्रक जाहीर झाले. यात केवळ आठ संवर्गातील परीक्षा झाली. दुसऱ्या टप्प्यातील १५ ते २३ ऑक्टोबरपर्यंतचे वेळापत्रक कंपनीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर केले. परंतु, आता परीक्षा अचानक तांत्रिक कारण देत पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे उमेदवार गाेंधळात पडले आहे.
त्यामुळे या परीक्षेतील सावळा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. सध्याचे वेळापत्रक स्थगित झाले असले, तरी कंपनीकडून पुढील वेळापत्रक जाहीर होताच, उर्वरित संवर्गातील पदांच्या परीक्षा होईल, असे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.



