District Division :लाेकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा विभाजन;शिर्डी मुख्यालयाचे ठिकाणही निश्चित

    129

    नगर :  प्रशासनाचे कामकाज अधिक गतीने होऊन नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा, या हेतूने राज्यात जिल्हा विभाजन (District Division) करून नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. या मागे त्या परिसरातील जनमताचा रेटाही होताच. त्यातच आता आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी या मुद्दयावर भाष्य केल्याने नगर जिल्हा विभाजनाचा विषय पुन्हा ऐरणीवर आल्याचे स्पष्ट हाेत आहे. 

    ”नगर जिल्हा विभाजनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिर्डीमध्ये उभ्या राहणार्‍या विविध सरकारी कार्यालयांच्या इमारती पाहता जिल्हा विभाजनानंतर शिर्डी हे मुख्यालयाचे ठिकाणही निश्चित झाल्याचे स्पष्ट होते. आता फक्त जिल्हा विभाजनाची योग्य तारीख व वेळ जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. सध्याची स्थिती पाहता लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा विभाजन होण्याचे संकेत असल्याचे भाजप आमदार राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

    मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आमदार शिंदे यांच्यावर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या बुधानी मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. बुधानी मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आमदार शिंदे नुकतेच मध्यप्रदेशला रवाना झाले. तत्पूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, प्रदेश चिटणीस अरुण मुंडे, सुरेंद्र गांधी, अनिल मोहिते आदी उपस्थित होते. 

    आमदार शिंदे म्हणाले, ”आता अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालय, नंतर आरटीओ आता अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांचे कार्यालय झाले, महसूल भवन उभारले जात आहे. याचाच अर्थ सर्व प्रमुख कार्यालये शिर्डीमध्ये उभारले जात आहेत. त्यामुळे जिल्हा विभाजनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यालयाचे शिर्डी हे ठिकाणही निश्चित झाले आहे. आता केवळ विभाजनाची तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती दिनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी नगर जिल्ह्याच्या नामांतराची घोषणा केली. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी पुन्हा पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. नामांतराचा विषय लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्गी लागेल, अशी अपेक्षा आमदार शिंदे यांनी व्यक्त केली.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here