
कोपरगाव : (Kopargaon) येथील बसस्थानक परिसर, सुभाषनगर भागात पुन्हा एकदा बिबट्या (Leopard) ची दहशत पहावयास मिळाली. या बिबट्याने तीन जणांवर हल्ला चढवत त्यांना जखमी केल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात पहाटे मनोज जाधव तर रात्री केतन गवळी, जाकीर कोथिंबीरे हे जखमी झाले. तर अनेक जण बिबट्याला बघून झालेल्या धावपळीत किरकोळ जखमी झाले आहेl. सदर जखमींना ग्रामीण रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सोमवारच्या (ता. १६) पहाटेपासूनच सदर बिबट्याचा बैलबाजार रोड, बसस्थानक परिसरात वावर होता. रात्री नऊच्या सुमारास पुन्हा बसस्थानक परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांना त्याला बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. यावेळी वनविभाग, पोलीस प्रशासन तसेच बस आगर कर्मचारी यांनी आपला जीव धोक्यात घालून सदर बिबट्याला जाळीमध्ये पकडण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्यांना त्यात अपयश आले आहे. बिबट्याने बसस्थानकाच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारत धारणगाव रोडने धूम ठोकत सुभाषनगर चमडे मार्केटकडे पलायन केले आहे. हा संपूर्ण थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सदर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली असून आता वनविभाग काय उपाययोजना करतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.