
नगर : ‘वसा विकासाचा, विचार बहुजनांचा’ हा विचार आपण संपूर्ण राज्यभर मांडत आहोत. जनतेचा विकास हाच आपला ध्यास आहे. विकास कामातून जनसामान्यांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन (Government) कटिबद्ध आहे. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी (development) निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात एलटी, एचटी ५६५ विद्युत वहिनी, १०० के.व्ही. च्या ३३६ रोहित्र उभारणीच्या कामाचे भूमिपूजन तसेच माता मोहटादेवी महिला देवदर्शन यात्रेचा प्रारंभ उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार नीलेश लंके, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदी मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाले, ”राज्यातील जनतेला अखंडितपणे वीज पुरवठ्यासाठी विद्युत विकासावर भर देण्यात येत आहे. पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला तसेच सर्वसामान्य व्यक्तीला शाश्वत व अखंडितपणे विजेचा पुरवठा व्हावा, यादृष्टीने ३९ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी खर्च करुन ११ के. व्ही. क्षमतेची २७८ किलोमीटर लांबीची वीजवाहिनी टाकण्यात येत आहे. विजेचा दाब आल्याने रोहित्रांवर ताण आल्याने ते नादुरुस्त होतात.
सुरळीतपणे विजेच्या पुरवठ्यासाठी १०० के. व्ही. क्षमतेचे ३३३ रोहित्रे बसविण्याबरोबरच ३१० किलोमीटर लांबीची थ्री फेज लघुदाब वाहिनीचे कामही या निधीतून करण्यात येणार आहे. वाडी-वस्तीवरील जे ग्राहक शेती वाहिनीवर आहेत. त्यांना गावठाण वाहिनीवर स्थलांतरीत करुन अखंडितपणे विजेचा पुरवठा करणे शक्य होणार आहे. पारनेर तालुक्यातील सुपा, पारनेर, वाडेगव्हाण, भाळवणी, कान्हूरपठार, टाकळी ढोकेश्वर, वडझिरे परिसरातील वीज ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे.”



