
शेवगाव : येथील श्री रेणुका माता मंदिर सह जिल्ह्यातील अन्य देवस्थानातही चोर्या झाल्या. या सर्व घटनांचे गांभीर्य ओळखून आम्ही एकाच्या मागावर होतो. मातेची कृपाच, सहकार्याच्या अथक प्रयत्नाला यश आले. तब्बल २२ ठिकाणी चोरी करणारी टोळी जेरबंद झाली. असे तपास लागल्यावर वरिष्ठ, राजकीय (Political) मंडळींकडून आमचे कौतुक होत असते. मात्र, आज अमरापूर ग्रामस्थ व रेणुका देवस्थानात होणारा सन्मान सोहळा अविस्मरणीय असल्याचे प्रतिपादन स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस (Police) निरीक्षक दिनेश आहेर यांनी केले.
अमरापूर (ता. शेवगाव) तसेच पंचक्रोशीतील गावांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुकामाता मंदिरातील चोरीच्या घटनेतील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. त्याबद्दल त्यांचा श्री रेणुका माता मंदिर संस्थान, अमरापूर ग्रामपंचायत, ग्रामस्थांच्या वतीने सन्मान सोहळा पार पडला, यावेळी ते बोलत होते. यावेळी राम महाराज झिंजुर्के, आप्पा महाराज, श्री रेणुकामाता मल्टीस्टेट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रशांत भालेराव, पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके, सरपंच आशाताई गरड, राहुल जोशी, गणेश शेंडगे, रामदास गोल्हार, बाळासाहेब चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, सहायक पोलीस निरीक्षक सोपान गोरे, पोलीस सहायक निरीक्षक तुषार धाकराव, सहायक फौजदार भाऊसाहेब काळे यांच्यासह पथकातील दत्तात्रय हिंगडे, मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, सुरेश माळी, रवींद्र कर्डिले, संतोष लोढे, भिमराज खर्से, रणजित जाधव, प्रशांत राठोड, भरत बुधवंत, अरुण मोरे, संभाजी कोतकर यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. प्रशांत भालेराव, सूत्रसंचालन सुखदेव मर्दाने यांनी केले तर गणेश शेंडगे यांनी आभार मानले. डॉ. प्रशांत भालेराव यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या कार्याचे कौतुक करून ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले. बक्षिसाचे ५१ हजार रुपये पोलीस दलातील भारतीय संघात कुस्तीसाठी निवड झालेल्या अर्चना काळे यांना भेट देत असल्याचे दिनेश आहेर यांनी जाहीर केले. सरपंच आशा बाबासाहेब गरड यांनीही ११ हजारांचे रोख बक्षीस दिले.




