criminals : घरफोडी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद

    136

    नगर : पारनेर, बेलवंडी, मिरजगाव व नगर तालुका परिसरात घरफोडी (burglary) करणारी सराईत गुन्हेगारांची (criminals) टोळी स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केली. या टोळीकडून चोरीचा दोन लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शाहरुख आरकस काळे (वय २५, रा. रांजणगाव मशिद, ता. पारनेर), राजेश अशोक काळे (वय २०, धाडगेवाडी, ता. पारनेर) व ऋषी अशोक काळे (वय २०, रा. रांजणगाव मशिद, ता. पारनेर) अशी टोळीतील जेरबंद आरोपींची नावे आहेत.

    उक्कडगाव (ता. नगर) येथे ५ सप्टेंबरला दादासाहेब शेळके यांच्या घरातील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातील ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व कागदपत्रे घेऊन चोर लंपास झाले. या संदर्भात दादासाहेब शेळके यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला.

    स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना या चोरी बाबत माहिती मिळाली की, ही चोरी पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशिद येथील शाहरुख काळे याने केली आहे. त्यानुसार पथकाने रांजणगाव मशिद येथे आरोपी शाहरुखचा शोध घेतला असता तो सुप्यातील सोनार गल्लीत चोरीचे सोने घेऊन गेला असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने सापळा रचून शाहरुख काळे, राजेश अशोक काळे व ऋषी अशोक काळे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचे सोने हस्तगत करण्यात आले. त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता हे सोने पारनेर, बेलवंडी, मिरजगाव न नगर तालुक्यात घरफोडी करून आणल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यांनी ही चोरी राम अशोक काळे (रा. धाडगेवाडी, ता. पारनेर) याच्या समवेत केली असल्याचे सांगितले. राम काळे पसार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

    जेरबंद आरोपींकडून दोन लाख ५३ हजार रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले. जेरबंद तीनही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. यापूर्वी शाहरुख काळेवर पाच, राजेश काळेवर तीन व ऋषी काळेवर तीन गुन्हे दाखल आहेत. जेरबंद आरोपींना पुढील तपासासाठी नगर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here