
नेवासा : बाभुळखेडा (ता.नेवासा) ग्रामपंचायत टेंडर घोटाळाप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने नेवासा (Nevasa) पंचायत समिती कार्यालयासमोर पाच दिवसांपासून सुरु केलेले उपोषण नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. सरपंच (Sarpanch) व ग्रामसेवक यांची चौकशी करुन कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्ष (Prahar Jan Shakti Party) चे तालुका कार्याध्यक्ष अनिल विधाटे, युवक अध्यक्ष विकास कोतकर, शाखाध्यक्ष पांडुरंग नवले यांनी उपोषण मागे घेतले.
गेल्या पाच दिवसांपासून हे उपोषण सुरुच होते. उपोषण सोडविण्यासाठी अनेक चर्चा व फेऱ्या होऊनही प्रशासनाकडून तोडगा निघत नव्हता, त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने टेंडर घोटाळ्याप्रकांनी अनेक तक्रारी केलेल्या होत्या त्या अनुषंगाने ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांना खुलासा मागितला आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तात्पुरते उपोषण स्थगित केले असल्याची माहिती यावेळी उपोषणकर्त्यांनी दिली.
संबंधित टेंडर घोटाळ्याप्रकरणी कारवाई न झाल्यास न्याय मागणाऱ्याला उपाशी ठेवून गैरव्यवहार करणाऱ्या व्यक्तींना अधिकाऱ्यांनी पाठीशी घातल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे, ॲड.वसंतराव विधाटे, जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲड. पांडुरंग औताडे, जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, संचालक दिलीप मते, आदिनाथ कडू, आप्पासाहेब निकम, चेअरमन उमाजी विधाटे, विष्णू कडू, गोरक्षनाथ विधाटे, शिवाजी विधाटे, आदिनाथ विधाटे, लहू विधाटे, शुभम मते आदी उपस्थित होते. उपोषणकर्त्यांना ज्यूस देऊन गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर, सहाय्यक गट विकास अधिकारी पाखरे यांनी मध्यस्थी करुन कारवाईची लेखी दिल्यानंतर आंदोलकांनी उपोषण सोडले.