
नगर : पातळ प्लास्टिक बंदी (Plastic ban) संदर्भात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिका (Municipality) कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या खाद्य पदार्थ विक्रेत्यावर तोफखाना पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सचिन वाघ असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
चौपाटी कारंजा येथे हातगाडीवर खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या सचिन वाघ यांच्या हातगाडीत पातळ प्लास्टिकच्या पिशव्या आढळून आल्या. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरू करताच सचिन वाघ याने महापालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. महापालिका कर्मचारी तुकाराम भांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तोफखाना पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
या संदर्भात नगर महापालिका कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संबंधितांवर महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. अन्यथा सोमवारी (ता. २५) तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा महापालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिला आहे.