मुंबई : बॉलिवूडमधून गायब झालेल्या अभिनेता रणवीर शौरीने वेब सीरीजच्या माध्यमातून पुनरागमन केले आहे. त्याची ड्रग्ज आणि अमली पदार्थांवर आधारित वेब सीरीज ‘हाय’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेब सीरीजचे प्रदर्शन होताच अभिनेता रणवीर शौरीने वादग्रस्त वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. ‘भारतात गांजाला कायदेशीर परवानगी मिळाली पाहिजे’, अशी मागणी त्याने केली आहे.
सध्या बॉलिवूडमध्ये ड्रग्ज प्रकरण खूप गाजते आहे. दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुलप्रीत सिंह, श्रद्धा कपूर अशी मोठी नावे या प्रकरणात समोर आली आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधले हे ड्रग्ज प्रकरण समोर आले आहे. या अभिनेत्रींचे ड्रग्ज मेसेज समोर आल्यानंतर एनसीबीकडून त्यांची चौकशीदेखील करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारानंतर रणवीर शौरीचे हे वक्तव्य सध्या वादग्रस्त ठरते आहे.
बॉलिवूडमध्ये पडद्याआड घराणेशाही चालते
याच दरम्यान रणवीरने बॉलिवूडमधल्या नेपोटीझमवर देखील भाष्य केले. तुला कधी कुठल्या स्टारकिडसोबत रिप्लेस करण्यात आले आहे का?, असा प्रश्न करताच रणवीर त्यावर बोलता झाला. तो म्हणाला, पडद्याआड या गोष्टी सुरूच असतात. हा पण हे खरे आहे की, अनेकदा माझ्या हाती आलेली स्क्रिप्ट मी इतर कुठल्यातरी अभिनेत्याला करताना पाहिली आहे. यापैकी बरेच स्टारकिड होते.
आता मात्र डिजिटल माध्यमांमुळे सर्वांना संधी मिळत आहे. ओटीटी माध्यमांचा वापर अतिशय योग्य पद्धतीने होतो आहे. त्यामुळे सगळ्यांना कामाची संधी मिळत आहे. जुनेच नाहीतर, अनेक नव्या कलाकारांनादेखील या माध्यमामुळे प्रसिद्धी मिळत असल्याचे तो म्हणाला.
काय म्हणाला रणवीर शौरी?
‘हाय’ वेब सीरीज प्रदर्शित झाल्यानंतर रणवीर शौरीने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्याला सध्या सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणासंदर्भात प्रश्न विचारला गेला. त्यावर बोलताना रणवीर म्हणाला, ‘बॉलिवूडमध्ये जितकी ड्रग्जची देवाण-घेवाण होते, तितकीच ती समाजात होते, असे मला वाटते. मी कितीतरी नॉन-बॉलिवूड पार्ट्यांमध्ये ड्रग्जचा सर्रास वापर पाहिला आहे.’
पुढे तो म्हणाला की, ‘ज्या लोकांना भारतात गांजा विक्री कायदेशीर व्हावी वाटते, अशा लोकांपैकी मी एक आहे. अनेक देशात गांजाला कायदेशीर परवानगी देण्यात आली आहे. भारतात मात्र, त्याच जुन्या कायद्यांची अंमलबजावणी सुरू आहे.